शहाणपणाने, देशातली सर्व लोकांच्या कल्याणाकरिता करणे, यांच्याऐवजी आपापल्या देशामध्ये इंग्लंड, अमेरिकेची मॉडेल्स् तयार करणे, तिथं कारखाने झाले म्हणजे तीच काय ती सुधारणा, शेतीप्रधान मानून आपण जर काही करायला गेलो तर मग त्याला अडाणीपणा म्हणायचा असाच विचार हा जवळ जवळ सगळया देशात राहिला. सुधारणा म्हणजे शेतीच्या अडाणीपणापासून दूर जाणे आणि लवकरात लवकर जाणे आणि त्याकरिता सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन जायचा प्रयत्न नाही झाला, उलट त्याकरिता जुन्या गोऱ्या इंग्रजांनी ज्या तऱ्हेने संबंध देशाचं शोषण केलं, त्याच तऱ्हेने शोषण करून हिंदुस्थानमध्ये काळे इंग्रज बनले आणि त्यांनी देशाच्या बाकीच्या भागाचं शोषण चालू ठेवलं.
हिंदुस्थानाच्या बाबतीत दुष्काळ कायमचे पडत आले आहेत. अगदी तुकारामाच्या काळापासून दुष्काळ पडलेले आहेत. हिंदुस्थान हा सोन्याचा धूर निघणारा देश हे त्याचं वर्णन फक्त काही 'ब्राह्मण' लेखकांनी केलेलं आहे. सर्वसामान्य लेखकांच्या दृष्टीनं हा देश कधी सोन्याचा होता हे दिसत नाही. १९३७ मध्ये इंग्रजांनी आपल्या सोयीकरिता ब्रह्मदेश (म्यानमार) वेगळा केला. ब्रह्मदेशात होणारं भाताचं उत्पादन हे सगळ्या हिंदुस्थानातल्या एकूण बाजारपेठेकरिता महत्त्वाचं होतं. हा भात यायचा थांबला. ब्रह्मदेशातला हा भात मिळायचा थांबल्यावर दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये इंग्रज सरकारने आपल्याच देशामध्ये वसुलीची जी व्यवस्था सगळ्या दोस्त राष्ट्रांच्या सैन्यांना धान्य पुरविण्याकरिता अवलंबिली त्यामुळे लक्षावधी माणसे दुष्काळामध्ये मेली. बंगालमध्ये मेली, बिहारमध्ये मेली. त्यांच्यानंतर स्वातंत्र्य आलं. स्वातंत्र्याच्या वेळी जी काही फाळणी झाली त्या विभागणीमध्ये शेतीची जमीन पाकिस्तानात गेली त्या मानाने माणसं कमी गेली. पश्चिम पंजाब हा सगळ्यात जुना बागायती प्रदेश. इंग्रजांनी पहिल्यांदा जिथे कालवे आणले आणि शेतीला सुरुवात केली असा पहिला भाग, सगळ्यात संपन्न. तो पाकिस्तानमध्ये गेला आणि त्यामुळे गव्हाचाही पुरवठा कमी पडला. १९३७ मध्ये भात गेला, ४७ मध्ये गहू गेला. ४२ मध्ये इंग्रजांनी लढाईच्या काळामध्ये धान्याच्या तुटवड्याला तोंड देण्याकरिता रेशनिंगची व्यवस्था पहिल्यांदा आणली आणि परदेशामध्ये हिंदुस्थानातलं धान्य गेलं, तरी मग कुठे मिळेल तिथून तांबडी ज्वारी, पिवळा मका, काही वेळा अमेरिकेतून बटाटे असं सगळं आणून काही ना काही करत ही रेशनिंग पद्धत चालू ठेवली. १९४७ पर्यंत रेशनिंग किंवा धान्य वाटपाची