पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुमच्याशी मला लढणं भाग पडेल' पण तरीही म. गांधींना अशा जवाहरलाल नेहरूंनाच आपला राजकीय वारसदार नेमावं लागलं आणि स्वातंत्र्य आल्यानंतर अंगावर पंचा नेसून हिंदुस्थानातील दरिद्रीनारायणाची बाजू मांडणाऱ्या म. गांधींच छोट्या उद्योगधंद्याच्या साहाय्याने खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत, देशातील सर्वात जास्त खंगलेल्या, लुटल्या गेलेल्या माणसाच्या दृष्टिकोनातून आर्थिक नियोजन झालं पाहिजे असं मानणारं स्वातंत्र्य लढ्याचं तत्त्वज्ञान फेकून दिलं गेलं आणि सहा महिन्यांच्या आता गांधीवादाचा पराभव होऊन नेहरूवादाचा जय झाला. एका अर्थाने, हा वादविवाद झाला, स्वातंत्र्याआधी झाला; पण स्वातंत्र्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत नेहरू -अर्थवादाची अनभिषिक्त सत्ता आली आणि ती गेली ४३ वर्षे चालू आहे.
 वादविवाद झाला नाही कारण शेतकऱ्यांत वादविवाद करायची ताकद नव्हती; पण शेतकऱ्यांविरुद्ध बाजू मात्र मांडली गेली, इतकेच नव्हे तर ती अत्यंत क्रूरपणे, अत्यंत भयानकपणे मांडली गेली. उदाहरणार्थ, शेतीमालाची किंमत जर का वाढली तर शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. ग्रामीण भागातल्या गरिबांचं तर फारच नुकसान होणार आहे; जर लोकांच्या राहणीमानाचा दर्जा वाढवायचा असेल तर धान्य स्वस्तच मिळायला पाहिजे अशा तऱ्हेची अत्यंत विपरीत भूमिका बहुतेक सर्व जाणत्या अर्थशास्त्राज्ञांनी मांडली आणि ती मांडताना अर्थशास्त्राला अजिबात मान्य होणार नाहीत अशा प्रचंड गफलती त्यांनी केल्या. एक उदाहरण पाहा. किमती वाढल्या म्हणजे शेतमजुरांचं नुकसान होतं हे दाखविण्याकरिता त्यांनी किमतीचा कोणता निर्देशांक घ्यावा ? त्यांनी शेतकऱ्याला काय किमती मिळतात हे नाही लक्षात घेतलं तर whole sale price Index म्हणजे घाऊक व्यापारी ज्या किमतीने विकतात त्या किमती लक्षात घेतल्या आणि मग किमती वाढत्या की शेतमजुराचं नुकसान होतं असा त्यांनी निष्कर्ष काढून दाखविला. घाऊक किमतींचा निर्देशांक आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या किमती यांचा तसा काही संबंध नाही; पण हे लक्षात न घेता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या किमती आणि शेतमजुरीची परिस्थिती या दोघांतील संबंध जुळवून दाखविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी घाऊक किमतीचा निर्देशांक आणि शेतमजुरांची परिस्थिती यांची तुलना करून शेतीमालाच्या किमती जितक्या वाढतील तितकी शेतमजुराची उपासमार जास्त होते असं हिंदुस्थातल्या अत्यंत मान्यवर आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळालेल्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलं आहे.

 देशामध्ये काय दिसतं? एका बाजूला शहरामध्ये उंच उंच, मजल्यांच्या

बळिचे राज्य येणार आहे / १५