पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/12

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चालू झाला नव्हता. शेतीची आर्थिक विकासातली भूमिका काय, नियोजनाच्या पद्धतीने शेतीचं काय होणार असे प्रश्नही मांडले गेले नाहीत ही मोठी चमत्काराची गोष्ट होती. काहीतरी वादविवाद व्हायला हवा होत. वादविवाद का झाला नाही?
 वादविवाद का झाला नाही याला दोन-तीन कारणं दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे वादविवादाला दोन पक्ष लागतात. या सर्व साम्राज्यांमध्ये जे जमीनदार होते त्यांचं स्वतःचंच जमीनदारीतलं स्वारस्य संपलेलं होतं. त्याच्याकडे जी संपत्ती होती ती जमिनीतून आली नव्हती, त्यांच्याकडची संपत्ती ही त्यांच्या व्यापारी कारभारामुळे कारखानदारी कारभारामुळे आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू मांडणारी, शेतीत स्वार्थ असलेली अशी माणसं कुणी नव्हती. जे कुणी होते ते जमीनदाराची बाजू मांडणारे होते. हिंदुस्थानातील जमीनदारांची भूमिका आणि शेतकऱ्यांची भूमिका या दोघांत मोठा फरक आहे. शेती आणि आर्थिक विकास यांचा परस्परसंबंध काय यांचा ऊहापोह करण्यापेक्षा नवीन विकासामध्ये आपल्या हाती काय पडेल ते पाडून घ्यावं या दृष्टीने या जमीनदारांनी नव्या शासनव्यवस्थेशी हातमिळवणी केली. कुणाला साखर कारखाना मिळाला, कुणाला सहकारी सोसायटी मिळाली आणि काय, काय! हे सगळे जमीनदार कारखानदारांचे साथीदार झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू मांडणारं कुणी उरलं नाही म्हणून वादविवाद झाले नाहीत.

 दुसरी गोष्ट. वादविवाद करण्याची गरजच काय होती ? जर काही बदल घडवून आणायचा असेल तर त्याच्याबद्दल वादविवाद होईल. इंग्रज साम्राज्यवाद्यांनी हिंदुस्थानच्या शरीरामध्ये रक्त शोषून घेण्याकरिता दीडशे वर्षे नळ्या खुपसूनच ठेवल्या होत्या. शोषणाची यंत्रणा तयारच होती आणि स्वातंत्र्य चळवळीवर ज्या जमीनदार, व्यापारी आणि कारखानदारांचंच प्रभुत्व होतं त्यांनी स्वातंत्र्यानंतर हाती सत्ता घेतली आणि इंग्रजांनी आयती तयार ठेवलेली यंत्रणाच ते चालवू लागले. सत्ता हाती आल्यावर त्यांचं काम एवढंच होतं की आतापर्यंत दुसऱ्याच्या नावावर शेतकऱ्यांच्या शोषणाचं यंत्र ते चालवत होते ते आता स्वतःच्या नावाखाली ते चालवायला लागले. यासाठी वादविवाद करण्याची गरज ती काय? देशाच्या विकासात शेतीचं आणि खेडेगावाचं स्थान काय आणि शहराचं स्थानं काय या प्रश्नावर महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यामधे फार प्रचंड मतभेद होते. म. गांधींनी याबद्दल नेहरूंना स्पष्ट म्हटलं होते की, 'जवाहरलाल, याविषयी तुमची जी काही मतं आहे त्यांविरुद्ध

बळिचे राज्य येणार आहे / १४