पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/116

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एवढाच काय तो फरक. पूर्वी जनसंघाने या विषयावर दिल्ली राजधानीत मोठा धुमाकूळ घातला होता. बजाज परिवाराच्या आग्रहापोटी पूज्य विनोबाजींनीही गोवधबंदीसाठी प्राणांतिक उपोषण मांडले होते. गोवधासंबंधी बोलताना बंदी कायद्याच्या पुरस्कर्त्यांच्या मनात प्रामुख्याने देवनारसारख्या कत्तलखान्यात किंवा इतरत्र कसायाच्या सुरीने होणाऱ्या कत्तलीचेच चित्र असते. कत्तलखान्यातील कसायाच्या सुरीपासून गोवंश वाचवला की जिंकलो असा त्यांचा विचार असतो.
 गायीचे रक्षण म्हटले की त्यांच्या नजरेसमोर एक वशिंडाची 'धेनू' किंवा 'नंदी'गायच असते. युरोपमध्ये, भारतीयांना परिचित व पूज्य असलेल्या एक वशिंडाच्या या गाईला 'झेबू' किंवा 'ब्राह्मण गाय' असे म्हणतात. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात आता संकरित गायींचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. गोवंशाचे संरक्षण करण्यासाठी सरसावलेल्यांच्या मनात सपाट पाठीची, बिनवशिंडाची होल्स्टीन फ्रिझन किंवा जर्सी संकरित गाय त्या वंशात मोडते किंवा नाही कोणास ठाऊक! पण गाय माता मानली तर संकरित गाय निदान मावशी मानणे योग्य होईल. महाराष्ट्र शासनाच्या कायद्यात नुसते गाय किंवा बैल म्हटले आहे; संकरित गायींचा काही अपवाद केलेला नाही. गोरक्षकांची इच्छा नंदी गायींचे आणि त्याबरोबरच संकरित गायींचेही संरक्षण करण्याची असावी.
 व्यवहारात परिस्थिती अशी आहे की कत्तलखान्यांपेक्षा शेतकऱ्यांच्याच घरी अधिक गोवंशाचा उच्छेद होतो. एका यशस्वी दूध व्यावसायिकाने मला स्पष्ट सांगितले की, दुधाचा धंदा फायद्याचा व्हायचा असेल तर संकरित गोऱ्हयाला एक दिवसही दूध पाजणे परवडणार नाही. एवढेच नव्हे तर संकरित गाय तीन दिवस कोण्या आजाराने बसून राहिली तर त्यानंतर तिला गोठ्यात ठेवणे परवडणारे नसते.

 आणीबाणीच्या काळात गायींसाठी कर्जे देण्याची टूम निघाली होती. पहिल्या वितीनंतर दूध थांबले आणि गर्भधारणा लांबली की तिला खाऊ घालणे परवडत नाही आणि पोराबाळांच्या तोंडचा घास काढून गाय जोपासणे कठीण जाते. या कारणास्तव गायीला जाणूनबुजून संपवण्यात येत होते. विमा कंपन्यांकडून भरपाईची रक्कम घेण्यासाठी गायीची शिंगे मृत्यूचा पुरावा म्हणून दाखवावी लागत. एकट्या धुळे जिल्ह्यात एक पुरे गोदाम शेतकऱ्याच्या घरी मेलेल्या (!) गायीच्या शिंगांनी भरलेले, विमा कंपनीच्या निरीक्षकाच्या फुरसतीची

बळिचे राज्य येणार आहे / ११८