पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाट पाहत पडलेले होते.
 गोवंशाचे संरक्षण म्हटले की केवळ कसाई-कत्तलीवर बंदी नाही. कसाईबंदीचा उपयोग कोणा जमातीला खिजवण्यासाठी होत असेल; पण त्यामुळे गायींना मारण्याचे थांबणार नाही. कायद्याने बंदी घालून आजपर्यंत कोणतीच सुधारणा झाल्याचा दाखला नाही. १८ वर्षांखालील मुलींची लग्ने सर्रास होतात. नवविधवा सती जात असल्याच्या बातम्या अजूनही येतात. दारूबंदी पोलिस खात्यालाच संपवून गेली आणि अफू-गांजावरील बंदीतून बाबा-महाराजांचे आश्रम आणि खलिस्तानसारख्या विभाजनवादी चळवळी निघाल्या. नवीन कायद्याने गोवंशाचे संरक्षण होणार अशी कायदा करणाऱ्यांचीही कल्पना नसावी. मुसलमानांच्या नाकावर टिच्चून कायदा केला एवढेच समाधान त्यांना पाहिजे असेल तर त्यांना ते नाकारता येणार नाही.
 गोसंरक्षकांची विचारपद्धती किंवा निदान प्रचारप्रणाली काहीशी विचित्र आहे. गायीचा विषय निघाला की ते काव्यमय भाषेत बोलू लागतात. गाय माता आहे, गोवंशाच्या अध:पतनामुळे देशाचा अध:पात झाला, 'गाय मरी तो बचा कौन?' असे मोठ्या निष्ठेने ते मांडतात. भारतीय गायीत काही अद्भुत गुण आहेत. तिच्या श्वासोच्छ्वासातून प्राणवायू बाहेर पडतो. तिच्या शेणात आणि मुतात काही विलक्षण पोषक, कीटकनाशक, आरोग्यदायक, आत्मसंवर्धक गुण आहेत असे ते विज्ञानातील अर्धेकच्चे संदर्भ देऊन सांगू पाहतात. खत म्हणूनसुद्धा गायीच्या शेणमुताची मातबरी इतर कोणत्याही जनावराच्या उत्सर्जनापेक्षा जास्त आहे असे आग्रहाने सांगतात. गाय आणि बैल यांचे शेतीला महत्त्व किती प्रचंड आहे आणि गोरक्षण व गोसंवर्धन एवढ्या एकच कलमी कार्यक्रमाने देश सुखी आणि समृद्ध होणाची ते खात्री सांगतात.
 बऱ्याच वर्षांपूर्वी राधाकृष्णजी बजाज या विषयावर चर्चेसाठी मला भेटले होते. त्यांचे सगळे वैज्ञानिक-अर्थशास्त्रीय विवेचन ऐकल्यानंतर मी त्यांना प्रश्न केला, 'राधाकृष्णजी, तुम्ही हिंदू म्हणून जन्मला नसता तर या कामाचा प्रचार इतक्या हिरीरीने केला असतो का?' बाकी काही असो, माणूस प्रामाणिक. त्यांनी कबूल केले की जन्माने मिळालेल्या सवर्ण सांस्कृतिक वारशाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे.

 पाँडिचरी येथील अरविंद आश्रमामध्ये नैसर्गिक शेतीचा मोठा व्यापक प्रयोग चालला आहे. त्याची पाहणी करत असताना तेथील प्रमुखांच्या तोंडी गायीचे शेण, गायीचे मूत हे शब्द वारंवार येऊ लागले; तेव्हा त्यांनाही मी

बळिचे राज्य येणार आहे / ११९