पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिळाली असती. भाकड जनावरे सांभाळण्याचे एक प्रचंड खातेच तयार झाले असते; पण असा विचार करण्याची विरोधकांना ना कुवत, ना फुरसत!
 दलित चळवळीतील एक कार्यकर्ते माझ्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. या विधेयकाला विरोध करण्यासाठी मुस्लिम-दलित संयुक्त आघाडी उभी करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि गायींचे संरक्षण हा सरसकट सगळ्या हिंदू समाजाचा कळकळीचा विषय नाही हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न होणार आहे. राम आणि शंबूकाची आणखी एक लढाई या विषयावर होऊ शकते.
 शिवसेना-भाजपाच्या कायद्याला विरोध करायचा हे ठरले; पण त्यासाठी युक्तिवाद काय करावा? याबाबत मात्र सन्माननीय दलित कार्यकर्त्यांच्या मनात मोठा गोंधळ दिसला. एरवी मांग, महार, ढोर चांभार इत्यादी जातींना गाववहिवाटीने त्यांच्यावर लादलेली बलुतेदारीची कामे नाकारण्याचे आवाहन करणारी दलित नेते मंडळी आता एकदम तोंड फिरवून उलटे बोलू लागली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कायद्यामुळे दलितांच्या वंशपरंपरेने चालत आलेल्या पोटापाण्याच्या व्यवसायावर गदा येईल व भारतीय संविधानात दिलेल्या मूलभूत हक्कांच्या हे विरोधात आहे अशी काहीशी वेडगळ मांडणी नेते करीत होते. व्यवसाय-स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क हा निखळ विनापवाद नाही. घटनेने याविषयी काही अपवादही ठरवले आहेत याची त्यांना माहिती दिसली नाही. आदिवासींच्या मागासलेपणाविषयी अश्रू ढाळावेत आणि एखाद्या प्रकल्पात त्यांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता पडली तर आदिवासींच्या 'निसर्गरम्य' जीवनाचा अंत होत असल्याबद्दलदेखील नक्राश्रू ढाळावेत, तसाच हा प्रकार.
 दलित नेत्यांनी आणखी एक अजब युक्तिवाद मांडला. गोमांस भक्षण फक्त मुसलमानच करतात असे नव्हे, मागासलेल्या जमातीतील अनेक गोमांस भक्षण करतात. त्यांच्या परंपरागत जेवणाच्या सवयीवर या कायद्याने आघात होत आहे असाही आक्रोश नेत्यांनी केला. या कायद्याने गोवंशाच्या मांसाच्या भक्षणावर बंदी घातलेली नाही. ज्यांचे त्याखेरीज चालूच शकत नसेल त्या लोकांना गोमांसाची आयात शेजारच्या राज्यातून करण्यास आजतरी कोणतीही बंदी नाही. भारतात आज गोमांसाचा भाव सगळ्यात स्वस्त आहे, ते एकदम महाग होईल हे खरे; पण भोजनस्वातंत्र्यावर निर्बंध आले असा घटनात्मक मुद्दा काढणे हास्यास्पद आहे.

 गोवधबंदीसाठी अनेक वर्षे अनेकांचे प्रयत्न चालू आहेत. गायीच्या वधावर यापूर्वीही बंदी होती. आता वळू, बैल, गोऱ्हे यांच्या वधावरही बंदी येत आहे

बळिचे राज्य येणार आहे / ११७