पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पडीक ठेवण्याची पद्धत होती, ती संपली. जैविक खतांसाठी जमिनीचा एक मोठा भाग राखून ठेवला जात असे, ती पद्धत बंद करून त्याही वावरांत शेती करायची असेल तर बाहेरून रासायनिक खते आणून टाकण्याखेरीज काही पर्यायच नव्हता. व्यापक प्रमाणावर निसर्गशेतीकडे वळायचे असेल तर आजच्या शेतजमिनीपैकी तिसरा भाग वने, कुरणे यांच्या वाढीसाठी नांगराखालून काढून घ्यावा लागेल. त्याचे आर्थिक परिणाम काय होतील, शेतीच्या स्तरावर काय होतील आणि देशाच्या स्तरावर काय होतील याचा अभ्यास झाला पाहिजे.
 फळबागांच्या शेतीत झाडांच्या मधल्या जागेत उगवणाऱ्या पालापाचोळ्याने फळझाडांची खतांची पुष्कळशी गरज भागून जाते. धान्ये, कडधान्ये यांच्या शेतीत अशी काही शक्यता नाही. मग जैविक शेतीकडे वाटचाल करताना अन्नधान्य आणि कडधान्य यांच्या उत्पादनाकडे बऱ्याच अंशी पाठ फिरवणे अपरिहार्य होईल. हा मुद्दाही दृष्टीआड होता कामा नये.
 सध्याची सर्व जैविक उत्पादने मलमूत्रादी उत्सर्जने पूर्णपणे वापरली तरी नत्र व स्फुरदाच्या आवश्यकतेची २० टक्केही पूर्ती संभव नाही असे काही तज्ज्ञ म्हणतात.
 उत्पादकतेची हरती शर्यत
 रासायनिक शेतीतील उत्पादनाइतकेच उत्पादन नैसर्गिक शेतीत होते असे मला अनेकांनी आग्रहपूर्वक सांगितले आहे. फारशा तपशिलात न जाता हा मुद्दा मान्य करण्यास मी तयार आहे; पण नैसर्गिक शेतीतील काही अतिरेकी, संकरित वाणाचे बियाणेसुद्धा स्वीकारण्यास तयार होत नाही. जैविक अभियांत्रिकीच्या नव्या युगात तयार होणाऱ्या नवीन वाणांच्या बाबतीत अशी स्पर्धा करणे निसर्गशेतकऱ्यांना शक्य होणार नाही. उत्पादनात पाच-पाच, दहा-दहा पटीचा फरक पडू लागला. त्याबरोबर नेमका पाहिजे त्या गुणवत्तेचा माल जैविक अभियांत्रिकीने तयार करता येऊ लागला तर नैसर्गिक शेतीस बाजारात टिकाव धरणे दुष्कर होईल.
 विज्ञानाचा पर्याय

 अन्नधान्याच्या स्वावलंबनाने काहीशी फुरसत मिळाली आहे. रसायनांवर मर्यादेबाहेर निर्भर राहण्याचे कटू परिणाम समजले आहेत. शेतकऱ्यांना लुटणारी 'नेहरू व्यवस्था' संपण्याची चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत एका नव्या शेती तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. नवे तंत्रज्ञान विद्यापीठातून येण्याची शक्यता नाही. मोठमोठ्या कंपन्या त्यांची उत्पादने खपवण्याचा प्रयत्न करतील

बळिचे राज्य येणार आहे / ११२