पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि त्यांचा वापर हेच उच्च तंत्रज्ञान असे भासवतील. शेतकऱ्यांनी सावध राहिले पाहिजे. गंडादोरे विकणारे मांत्रिक, तांत्रिक, धर्मवादी, समाजवादी, पर्यावरणवादी शेतकऱ्याला घेरतील. कुणी त्याला सुबाभुळीचे बी विकेल, कुणी गांडुळे. या सगळ्यांपासून दूर राहून शेतकऱ्यांनी विज्ञानशेती करण्याची गरज आहे. विज्ञानशेती निसर्गशेती असेल किंवा नसेलही; आग्रह बुद्धी, अनुभव आणि तर्क यांच्या वापराचा पाहिजे. रसायनांचा आग्रह नको गोमूत्राचाही नको.
 विज्ञान कोणा व्यक्तीस प्रमाण मानत नाही, कोणा ग्रंथासही प्रमाण मानत नाही; कोणा एका विचारप्रणालीलाही विज्ञान सदासर्वकाळ प्रमाण मानत नाही. सकल इंद्रियांचा जागरूकतेने वापर करून भोवतालचे जग कालच्यापेक्षा आज अधिक समजून घ्यावे; कणाकणाने आणि क्षणाक्षणाने ज्ञानाचे कण परिश्रमपूर्वक वेचावे आणि तरीही आपल्या निष्कर्षांबद्दल शंका बाळगावी विज्ञानाची प्रकृती आहे. पुरावा थोडा, श्रद्धा मात्र मोठ्या दाट हा धर्मवाद्यांचा स्वभाव. निसर्गशेतीच्या भक्तांनी विनाआधार श्रद्धा जोपासण्याचा मोह टाळला पाहिजे. विज्ञाननिष्ठेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्ञान हे पुढे जाणारे असते. मनुष्याची प्रगती होत आहे. भूतकाळात मागे जाऊन प्रगती होत नाही. रसायनांनी झटका दिला म्हणून पुन्हा एकदा खताच्या खड्ड्यात जाऊन बसले यात शहाणपण नाही.
 संचित अनुभवांची 'सीताशेती'
 जगभरच्या विज्ञानाच्या अफाट प्रगतीत भारतीय शेतकऱ्याचा पाय टिकेल काय ? 'नेहरू व्यवस्थे'त संशोधनाच्या चोरीला प्रतिष्ठा आली, परदेशी पुस्तक नकलणारे शास्त्रज्ञ ठरले. नियोजन व्यवस्थेत आम जनतेचा प्रगत तंत्रज्ञानाशी संपर्क विद्यापीठातील विद्वान आणि पंडित यांच्या माध्यमातूनच शक्य होतो. इतकी वर्षे सरकार ठरवेल तेवढीच परदेशी संशोधनाची फळे लोकांपर्यंत पोचण्याची मुभा. खुल्या व्यवस्थेत आता शास्त्रीय प्रगती तुकाराम ग्यानबाच्या डोळ्यांर्यंत येणार आहे. पाश्चिमात्य पद्धतीच्या संशोधनाची त्याची अजूनही औकात तयार व्हायची आहे.

 पण पिढ्यान्पिढ्यांच्या संचित अनुभवांचा त्याला मोठा आधार आहे. गावोगाव, घरोघरी कितीतरी अनुभवांच्या गोष्टी सांगितल्या जातात. झेंडूची फुले लावल्याने मिरचीवर रोग पडत नाही. तांबडा राजगिरा पेरला तर लव्हाळा हटतो, असा संशोधनाचा कच्चा माल आमच्याकडे उदंड आहे. या साऱ्या समजुती प्रयोगाने तपासून पाहाव्या लागतील. प्रयोगशीलतेतून शेतीचे नवे

बळिचे राज्य येणार आहे / ११३