पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आशा खोटी आहे.
 गच्चीवरील शेतीचे अर्थकारण
 निसर्गवाद्यांतील भली भली माणसे शेतीच्या अर्थकारणाचा प्रश्न दुय्यम आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करतात; आपण विज्ञानवादी आहोत, प्रयोगवादी आहोत असा घोष चालू असतानाच 'गच्चीवरील शेती' किंवा 'अर्ध्या गुंठ्यात एका कुटुंबाचे पोषण' असल्या कल्पना मांडताना हिशेबात हातचलाखी करून धोका देतात. एक पिशवीभर केरकचरा, उष्टेमाष्टे, शेण, कुजलेले पदार्थ एकत्र केले तर खर्च काहीच नाही; पण त्यातून कुटुंबाला पुरतील इतकी केळी, आंबे उत्पादन करता येतात या युक्तिवादातली हातचलाखी उघड आहे. बिनखर्चाने पोतेभर कुजलेले पदार्थ जमा करणे फारसे कठीण नाही; पण प्रत्येक शेतकऱ्याने अशी ५० पोती जमा करायची म्हटले तर स्वयंपाकघरातील उष्टेमाष्टेसुद्धा दुर्मिळ होईल आणि चढ्या किमतीने ते विकत घ्यावे लागेल. एका वेलीवरचा वनस्पतिशास्त्रीय प्रयोग लाखो वेलींना लागू पडतो; पण एका वेलीचे अर्थशास्त्र आणि २०० वेलींचे अर्थशास्त्र यात जमीनअस्मानचा फरक असतो.
 दोन गुंठे वांगी
 असाच नजरबंदीचा खेळ बिहारमध्ये काही मंडळींनी केला. कोरडवाहू जमिनीत २ गुंठे वांगी पिकवली आणि त्याच्या आधाराने एकरी साडेतीन लाख रुपये फायदा होऊ शकतो असा दावा मांडला. निसर्गशेतीचे प्रयोग करताना अर्थशास्त्राच्या नियमातून आपण सुटून जाणार आहोत अशी कल्पना कोणाही निसर्ग शेतकऱ्याने ठेवू नये.
 एवढे सगळे सांगितल्यानंतर तरीही आता मी म्हणेन की, तीस वर्षांपूर्वी रासायनिक शेतीला पर्याय नव्हता. रासायनिक शेतीने जहाज ते रेशन दुकान ही परिस्थिती संपवली. आता काही फुरसत मिळाली आहे, उसंत मिळाली आहे, संकट टळले आहे, आता काही नवा मार्ग शोधण्याच्या कामास लागले पाहिजे.
 सम्यक पातळीवर निसर्गशेती

 स्वातंत्र्यानंतर अधिक धान्य पिकवा मोहीम हाती घेतली गेली. धान्य तर अधिक पिकवायचे, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांची लूटही करायची, शेतीत भांडवल निर्मिती होणार नाही अशी व्यवस्था राबवायची हे सरकारी धोरण अमलात आणण्याकरिता पडीक जमीन लागवडीखाली आणण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्या काळात जमिनीचा तिसरा भाग तरी पाळीपाळीने

बळिचे राज्य येणार आहे / १११