पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यशवंतराव चव्हाणांचा हाच अनुभव, विश्वनाथ प्रताप सिंगांचाही अनुभव तोच. शरद पवारांनाही हा अनुभव येऊन चुकला होता; पण गडी अस्सल बारामतीचा पैलवान! अंगाला तेल लावून, विरोधकांच्या पेचातून सटकावे कसे यात पारंगत. (काँग्रेस) संस्कृतीच्या गोष्टी बोलत ते अलगद परत गेले. पंतप्रधान होवोत, ना होवोत, त्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांत आज त्यांची गणना आहे. इंदिराजींच्या काळी महाराष्ट्रात पक्षाशी निष्ठा राखून राहिले, एवढाच ज्यांचा गुण असे अनेक गणंग अजूनही त्यांच्यावर खार खाऊन आहेत. काँग्रेस पक्षाचा सत्तेवर एकाधिकार नाही; पण ताबा आहे याचा संबंध त्यांच्या शासनाच्या कार्यक्षमतेशी, गुणवत्तेशी किंवा स्वच्छतेशी आहे असे महान पक्षाभिमानीदेखील म्हणणार नाहीत. नरसिंह रावांचे सरकार आल्यापासून शेअर घोटाळा, हर्षद मेहतांची सूटकेस, बोफोर्स प्रकरणातील माधव सिंह सोळंकींचा हस्तक्षेप अशी एकामागून एक प्रकरणे दर दोनचार महिन्यांनी निघतच असतात. काँग्रेस पक्षात सत्तेचा फायदा निग्रहाने न घेतलेले आणि सार्वजनिक आयुष्य वैराग्याने निभावून नेणारे, एक पैशाचाही गैरफायदा न घेतलेले असे कोणीही औषधापुरतेही शिल्लक नाहीत. जनता पक्ष किंवा जनता दल यांच्या राजवटीत मंत्रिमंडळात असे थोडेफार तरी लोक होते. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे विनंताअर्ज निःस्पृहपणे फेटाळून लावणारे मंत्रीही होते. त्यांच्यावर कार्यकर्ते भयानक नाराज झाले. काँग्रेस मंत्र्यांपेक्षाही स्वतःच्या पक्षाच्या निःस्पृह लोकांवर त्यांचा रोष अधिक. भ्रष्टाचारात लडबडलेली काँग्रेसची मंडळी सत्तेवर टिकून राहिली, भ्रष्टाचार धुऊन काढण्याच्या निश्चयाने जे सत्तेवर आले, ते टिकले नाहीत. काँग्रेसी भ्रष्टाचार विरोधकांच्या स्वच्छतेपेक्षा अंततोगत्वा लोकांना अधिक भावतो, याचा अर्थ काय?

 काँग्रेस पक्षाकडे काही मोठा विचार, तत्त्वज्ञान किंवा कार्यक्रम होता असे नाही. याबाबतीत, म्हटले तर, विरोधकांची बाजूच सरस होती. जेथे जेथे म्हणून चूक करणे शक्य होते तेथे तेथे काँग्रेसने चुका केल्या. त्या काँग्रेसच्या चुकांमुळे चीनपुढे मानहानी स्वीकारावी लागली. काँग्रेसच्या चुकीमुळे जातीयवाद फोफावला, धर्मवाद माजला. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर काँग्रेसचा अबाधित ताबा राहिल्याने देशात आज जे जे काही अमंगल, भयानक घडत आहे त्या सगळ्यांचीच जबाबदारी काँग्रेसच्याच शिरावर पडते आणि तरीही काँग्रेसचा सत्तेवर ताबा टिकून आहे.

पोशिंद्यांची लोकशाही / ६६