पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १९८९-९० सालच्या विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाच्या सत्ताग्रहणाच्या अनुभवाबद्दल अजून कोणी काही पुस्तक लिहिलेले नाही. त्या काळच्या घटना हताशपणे पाहण्याचे दुर्भाग्य ज्यांना लाभले, त्या सगळ्यांची धारणा स्पष्ट आहे, की वैयक्तिक हेवेदावे, पंतप्रधानांच्या खुर्चीला क्षणमात्र का होईना आपले बूड एकदा टेकावे अशी अगदी किरकोळ कार्यकर्त्यांच्या मनातील वासना यामुळे जनता दलाचे सरकार कोसळले; मंडल, कमंडल केवळ निमित्तमात्र.
 काँग्रेसच्या बाहेर जो जो म्हणून पडतो, तो संपून जातो. नेताजी सुभाषचंद्र बोस काँग्रेसशी भांडून बाहेर पडले, फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केला. नेताजींच्या आझाद हिंद फौजेच्या हौतात्म्याने ते अजरामर झाले; पण फॉरवर्ड ब्लॉक हा त्यांचा पक्ष बंगालच्या एका कोपऱ्यातून पुढेसुद्धा सरकला नाही. स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहास लिहिताना नेताजींचा, झाला तर कोठे, अस्पष्ट उल्लेख होतो. एवढेच नाही तर, स्वातंत्र्याची चळवळ म्हणजे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींनी उभी केलेली वानरसेना असा अधिकृत काँग्रेसी इतिहास मांडला जातो.

 १९४२ सालच्या आंदोलनानंतर क्रांतिकारी नेतृत्व म्हणून झळाळीने पुढे आले ते जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, नरेंद्र देव याचे. स्वातंत्र्य पाचदहा वर्षे उशिरा आले असते, तर काँग्रेसचे प्रस्थापित नेतृत्व बाजूला फेकले गेले असते आणि नवे उमेदीचे नेतृत्व पुढे आले असते, हे सर्वमान्य आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरात समाजवादी काँग्रेसपासून फुटून निघाले. त्यांनी वेगळा समाजवादी पक्ष स्थापन केला. जमाना समाजवादाचा होता. सर्वत्र समाजवादाचा उद्घोष चालू होता. देदीप्यमान नेतृत्व उपलब्ध होते आणि तरीही १९५१ च्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत म्हणजे अवघ्या तीन वर्षांत समाजवादी पक्षाचे तीनतेरा वाजले. काँग्रेसच्या बाहेर पडतो, तो संपतो. काँग्रेस पक्षातील कण्यांना सोन्याचे मोल आहे, विरोधातील बासमती कोंड्याच्या भावाने जातो, हा अनुभव अनेकांना आला. चंद्रशेखर, मोहन धारिया आणि कृष्णकांत हे तिघे काँग्रेसमध्ये तरुण तुर्क म्हणून गाजलेले. काँग्रेसमध्ये राहिले असते, तर नरसिंह राव, शंकर राव यांच्या कितीतरी वर असते; पण पक्ष सोडून बाहेर जाण्याची दुर्बुद्धी त्यांना झाली आणि ते संपले.

पोशिंद्यांची लोकशाही / ६५