पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अर्थकारणात तर काँग्रेसने घातलेले गोंधळ अवर्णनीय आहेत. राजकुमारी अमृत कौर यांच्या संकोचाची मर्यादा तुटू नये म्हणून लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब नियोजन स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिले. अन्नधान्याचा तुटवडा दूर करण्यासाठी परदेशांतून आयात करून साऱ्या शेतीक्षेत्राला संकटात टाकण्याचे काम काँग्रेसने आज या घटकेपर्यंत सातत्याने चालवले आहे. 'समाजवादी' शब्दाचादेखील वल्लभभाई पटेल आदी अनेकांना राग होता. समाजवादी पक्ष काँग्रेसमधून फुटून निघाला, ते काँग्रेसच्या समाजवादविरोधी भूमिकेमुळे. आवाडी काँग्रेसपर्यंत 'समाजवादी' असा शब्द वापरण्याची हिंमत पंडित नेहरूंचीही झाली नव्हती; समाजवादी धाटणीची समाजव्यवस्था असा अवडंबरी शब्दप्रयोग करावा लागला होता. त्यानंतर, इंदिरा गांधींनी ४२ व्या घटना दुरुस्तीने सारे गणराज्य समाजवादी असल्याची तरतूद करून टाकली, एवढेच नव्हे तर, समाजवादी विचाराच्या निष्ठेची शपथ घेतल्याखेरीज कोणालाच निवडणूक लढवता येणार नाही असा कायदा केला. त्यानंतर, दोन दशके उलटण्याच्या आधी त्याच काँग्रेस पक्षाने चुकतमाकत का होईना किंवा आपद्धर्म म्हणून का होईना, उलटे तोंड फिरवून, खुल्या बाजारपेठ व्यवस्थेकडे वाटचाल चालू केली. चक्रवर्ती राज गोपालाचारींच्या स्वतंत्र पक्षाचा काँग्रेसने धुव्वा उडवला आणि त्याच पक्षाची विचारधारा आणि कार्यक्रम घेऊन, काँग्रेस आज आगेकूच करत आहे, विजयी होत आहे आणि वाहव्वाही मिळवत आहे. हा काय चमत्कार आहे? याचा सखोल विचार करण्याची संधी रावसाहेबांच्या लाल किल्ल्यासमोरील शेखीने आणि मधू लिमयेंच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मिळाली आहे.

 काँग्रेसची सत्तेवर मजबूत पकड राहिली आहे हे खरे; पण याचा अर्थ निवडणुकीत काँग्रेसला फार प्रचंड प्रमाणावर मते मिळतात, असे नाही. आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांत निम्म्याच्या वर मते मिळाली असे एकदाच घडले. १९८४ मध्ये राजीव गांधी ५१.५२ % मते मिळवून, जवळजवळ तीन चतुर्थांश जागा जिंकून गेले. विरोधकांची एकजूट झाली तर काँग्रेसला जिंकणे कठीण जाते, हे सर्वमान्य आहे. निवडणुकांच्या निकालांचा अंदाज घेणारे संख्याशास्त्रज्ञ विरोधी पक्षांच्या ऐक्याचा निर्देशांक काढतात. अशा तऱ्हेने केलेले अंदाज खूपसे बरोबर ठरतात असा अनुभव आहे. अनेक पक्ष असणारा भारत काही एकमेव देश नाही. फ्रान्ससारख्या

पोशिंद्यांची लोकशाही / ६७