पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हे, दुर्दैवी का होईना, वास्तव आहे. सत्तेतील भ्रष्टता टाळण्याकरिता सत्तास्थाने बहुविध असावीत, अनेक असावीत, सार्वभौम असावीत ही मांडणी अराजकाची नाही, बहुराजकाची आहे.
 डार्विनवादाचा आरोप असाच खोटा आहे. जगून राहण्याची धडपड विनाशकारीच असते हे खरे नाही. संघर्षात माणसाचे यच्चयावत ऊर्जास्रोत संपूर्णपणे पणाला लागतात. त्या स्पर्धासंघर्षात जे टिकणार नाहीत त्यांना 'जोपासना वर्गा'त जाता येईल. खुल्या स्पर्धेत कच्चे लिंबू म्हणून भाग घेण्याचा आग्रह त्यांना सोडावा लागेल किंवा वरच्या वर्गात बरोबरीला येण्याची क्षमता सिद्ध करावी लागेल.
 'खुली व्यवस्था'वादी राष्ट्रवादी नाहीत, आंतरराष्ट्रवादी आहेत हा आरोपही चुकीचा आहे. व्यक्तीच्या विकासाच्या धडपडीत विविध प्रकारच्या संघटना उदयाला येतात, नष्टही होतात. कुटुंब, गाव, जाती, धर्म, राष्ट्र अशा चढत्या श्रेणीच्या संघटना उत्क्रांतीच्या प्रवाहात माणसाने तयार केल्या. या सगळ्या संघटनांचे आणि सामुदायिक जाणिवांचे अलग अलगपणे आणि एकत्र मोठे महत्त्व आहे. आजपर्यंत माणसाची वाहतुकीची, संचाराची, देवघेवीची साधने मर्यादित राहिली. त्यामुळे त्याचे सारे संपर्क भूगोलाने मर्यादित केले. तंत्रज्ञानाची प्रगती वाढेल, तासाभरात पृथ्वीप्रदक्षिणा करता येईल किंवा आपल्या जागी बसून, जगातील दुसऱ्या कोणत्याही माणसाशी बोलता येईल, तिला पाहता येईल, कदाचित् स्पर्शही करता येईल अशी प्रगती झाली, तर भौगोलिक राष्ट्र या संकल्पनेचे फारसे महत्त्व राहणार नाही, हे उघड आहे.
 कांगावखोर 'स्वदेशी' वाले
 पण, आज तशी स्थिती नाही. प्रादेशिक सरहद्दीत शेजारी म्हणून राहणाऱ्या लोकांमध्ये विविध प्रकारांनी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक जवळिकीची भावना आहे. आपापल्या समाजात वावरताना घरी असल्यासारखे वाटते, ही जाणीवही मोठी मौल्यवान गोष्ट आहे. त्यासाठी शेकडो भगतसिंग फाशी चढायला तयार होतात. खरे तर, राष्ट्रवादाचा आणि स्वदेशीचा उदे उदे, उद्घोष करणाऱ्या लोकांनी राष्ट्रकल्पनेचा बाजार मांडला आहे. 'स्वदेशी'च्या नावाखाली आपला खत्रूड माल आपल्याच देशबांधवांच्या गळी महागड्या किमतीने बांधता आला म्हणजे देशभक्ती आणि कातडीचा रंग थोडा वेगळा असणाऱ्या लोकांनी सर्वसामान्य जनतेला उत्कृष्ट माल कमी भावात आणून दिला तर मात्र देश बुडाला अशी हाकाटी करणाऱ्यांचा 'स्वदेशी' हा कांगावा आहे.

 'स्वदेशी'वाल्यांनी देशाला काय दिले? महान परंपरांचा, उज्ज्वल इतिहासाचा

पोशिंद्यांची लोकशाही / ६१