पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हा देश. आजही इथली माणसे परदेशांत गेली तर सर्वांना अचंबा वाटावा अशी कर्तबगारी दाखवतात. समाजवाद्यांनी, सरकारवाद्यांनी, 'स्वदेशी'वाद्यांनी स्वार्थासाठी देशाभोवती कुंपणे घातली आणि एक महान राष्ट्र जगातील कंगाल आणि दळभद्री राष्ट्र बनवून टाकले. देशातील 'खऱ्या राष्ट्रवाद्यांची' इच्छा ही कुंपणे तुटावीत, इथल्या कर्तबगार जनतेच्या हातापायांतील सरकारशाहीच्या दंडबेड्या तुटाव्यात आणि जगातील राष्ट्रांच्या बैठकीत भारताला त्याचे इतिहाससिद्ध, निसर्गसिद्ध स्थान पुन्हा एकदा लाभावे अशी आहे. स्वतंत्रतावाद्यांची भूमिका राष्ट्र जोपासण्याची आहे, राष्ट्र खाण्याची नाही.
  'स्वतंत्र भारत'च्या पाइकांचे स्वप्न
 जगात भारताचे स्थान पुन्हा एकदा उंचावण्याचा कार्यक्रम फारसा कठीण नाही. एकविसावे शतक उगवण्याआधी त्याची अंमलबजावणी सहजशक्य आहे. या देशाचे लोक प्रेरणा घेऊन उठले, तर तीन वर्षांत हे होऊ शकेल. कार्यक्रम सोपा आहे. सरकारी हस्तक्षेप कमी करा, सरकारशाहीचे ओझे उतरवा, गेल्या पन्नास वर्षांत सरकारशाहीने देशाचे जे नुकसान केले, ते नुकसान संपवावे आणि राष्ट्राच्या जिव्हारी लागलेल्या जखमा भरून काढा.
 बेकारी, गरिबी, भ्रष्टाचार, गुन्हेगारी यांनी जर्जर झालेल्या या देशाचा आज जगात मान नाही. इथेल भाईबंददेखील देशातून निघून वेगळी चूल मागत आहेत. भारत स्वतंत्र झाला, तर आज त्याची हेटाळणी करणारे, दुष्टावा करणारे, त्यापासून फुटून जाऊ पाहणारे उद्या त्याच्याशी संपर्क असावा, जमले तर त्याने आपणास सामावून घ्यावे असे प्रतिपादू लागतील आणि त्यासाठी जुन्या इतिहासातील, पुराणातील नकाशांचे दाखले देऊन अखंड भारताचा आग्रह धरू लागतील. हे स्वातंत्र्याच्या पाइकांचे स्वप्न आहे.
 यासाठी 'स्वतंत्र भारत' चळवळीचे तोरण बांधायला घेतले आहे.

(२१ जून १९९४)

◆◆

पोशिंद्यांची लोकशाही / ६२