पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शासन विकासातील आडकाठी
 ९ : शासन जितके अधिक तितका विकास कमी. फार फार तर कायदा, सुव्यवस्था इत्यादी गोष्टी शासनाने पाहाव्यात. अर्थकारण, शिक्षण, अध्यात्म, न्याय, प्रसार माध्यमे या क्षेत्रातील सत्तास्थाने स्वतंत्र आणि सार्वभौम असली पाहिजेत.
 सगळ्या जगात जे खुलेपणाचे वारे वाहत आहे त्याचा अर्थ हा असा आहे. स्वराज्याची तहान सुराज्याने भागणार नाही, असे लोकमान्य म्हणाले. वर्तमान घटनांचा निष्कर्ष असा, की खरे स्वराज्य आपोआपच सुराज्य असते. 'सुराज्य' नाही, तेथे 'स्वराज्य' नाही असे निःशंकपणे समजावे. 'इंडिया-भारत' द्वैत तयार झाले, की गरिबीने ठाण मांडलेच म्हणून समजा.
  'समाज'वाद्यांची टीका
 स्वातंत्र्याच्या पाइकांची ही अशी भूमिका आहे. स्वातंत्र्य, स्पर्धा, खुली व्यवस्था असे शब्द वापरले, की व्यक्तीपेक्षा समाज महत्त्वाचा मानणाऱ्या विचारांच्या वेगवेगळ्या रंगछटा असलेल्या समाजवाद्यांचा व्यक्तिवाद्यांवर टीकेचा भडिमार सुरू होतो. तुमचा समानतेवर विश्वास नाही, तुम्ही विषमतावादी आहात, तुम्ही डार्विनवादी आहात, समर्थांनी तेवढे जगावे, दुर्बलांनी नष्ट व्हावे अशी तुमची धारणा आहे, तुम्ही अराजकवादी आहात, समाजात सत्तास्थाने म्हणून तुम्हाला नकोत, तुम्ही राष्ट्रवादी नाहीत, तुम्हाला स्वदेशाचा अभिमान नाही, असा आरोपांचा भडिमार होतो. या टीकांतील निरर्थकता दाखवणे महत्त्वाचे आहे.
 स्वतंत्रतावादी भूमिका
 स्वतंत्रतावादी व्यक्तीला केंद्रस्थानी मानतात. व्यक्तीची अनन्यसाधारणता पवित्र मानतात; पण याचा अर्थ, मनुष्यप्राण्यांत श्रेष्ठ-कनिष्ठता मानतात असे नाही. कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. जो तो अनन्यसाधारण आहे आणि ज्याच्या त्याच्या फूटपट्टीने श्रेष्ठ आहे. मनुष्यप्राणी समान आहे. त्याचे समानत्व त्याच्या अनन्यसाधारणपणात आहे. जन्मजात आळशी माणूससुद्धा कनिष्ठ नाही. स्वस्थ आरामात पडून राहावे, त्यामुळे, पोटाला थोडे कमी मिळाले तरी चालेल, संसार नासला तरी चालेल. इतक्या खंबीरपणे आळशी असलेला मनुष्यदेखील उद्योगी पुरुषसिंहापेक्षा कनिष्ठ नाही. त्याच्या वैशिष्ट्याचे पारितोषिक त्याच्या क्षेत्रातील चलनातच मिळणार, उद्योजकांच्या चलनात नाही, एवढाच काय तो फरक.

 स्वतंत्रतावादी अराजक मानत नाहीत. सत्तास्थाने लागतात, उपयोगी असतात

पोशिंद्यांची लोकशाही / ६०