पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शब्दास मराठी भाषेत पर्यायी शब्द नाही; पण राष्ट्राचे नाव घेणारी आणि सुस्थापितांचे रक्षण करणारी म्हणजे फॅसिझम. रावसाहेबांच्या म्हणण्याचा अर्थ असा, की काँग्रेस हरली तर देशावर भाजप- फॅसिझमचे राज्य सुरू होईल.

 भाजपात काही उदारमतवादी सज्जनही आहेत; पण त्यांचीही भाषा आणि वर्तणूक पाहिली, तर काही काळातच शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल असल्या खुलेआम झुंडशाही संघटना त्यांच्यावर ताबा मिळवतील हे स्पष्ट दिसते. लोकशाहीची उघडउघड चेष्टा करणारी मंडळी नेतेपदी आहेत. उघड उघड गुंड वापरण्याची भाषा आजही ते करतात. मुसलमान चांगला असला, तरी पारखून घेतला पाहिजे. कारण अवलाद कुणाची अशी भाषा वापरतात. अडवाणी, प्रमोद महाजन, बाळ ठाकरे ही फॅसिस्ट मंडळी आहेत यात काही शंका नाही; पण त्यांच्यावर टीका करण्याचा काँग्रेसला काय हक्क आहे? खोटा राष्ट्रवाद आणि हुकूमशाही हे फॅसिझमचेच दोन घटक. हुकूमशाहीत काँग्रेस काही कुठे कमी पडली नाही. जेव्हा जेव्हा जेथे जेथे बळाचा वापर आवश्यक किंवा सोईस्कर होता तेथे तेथे काँग्रेस शासनाने बळाचा वापर करून, जनआंदोलने मोडून काढली आहेत. आणीबाणी हे अशा हुकूमशाहीचे एक उदाहरण. इतर काही देशांतील हुकूमशाहीप्रमाणे काँग्रेसला बेबंद हुकूमशाहीचा दरारा तयार करावा लागला नाही, हे खरे; पण त्याचे श्रेय भारतातील लोकशाही परंपरेला आणि लोकांच्या समजूतदारणाला आहे. इतर काही हुकूमशहांप्रमाणे भर रस्त्यात शेकडो तरुणांना डोळे बांधून, उघडे करून, त्यांच्यावर गोळीबार करण्याचे प्रकार काँग्रेस राज्यांत फारसे घडले नसतील (तेलंगण, नक्षलवादी, पंजाब, काश्मीर, आसाम यांसारखे अपवाद सोडता.); पण विक्राळ विदेशी हुकूमशहांनाही न जमलेली गोष्ट काँग्रेसने सहज करून दाखवली. घराण्याची सत्ता तयार करणे अगदी स्टॅलिनलाही जमले नाही; पण राजीव गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानपदासाठी प्रियांकाच्या नावाची गंभीरपणे चर्चा व्हावी इतकी बेबंद घराणेशाही काँगेसने प्रत्यक्षात दाखवली. या बाबतीत काँग्रेस आणि भाजप यांत डावे-उजवे करण्यासारखे काही नाही. भाजपने हिंदुराष्ट्राची घोषणा देऊन, सर्वसामान्य जनतेचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसनेही आजपर्यंत हेच केले. नाव राष्ट्राचे, राष्ट्रभक्तीचे, राष्ट्राला एकविसाव्या शतकात नेण्याचे, विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आणण्याचे; पण या खोट्या घोषणांच्या आवरणाखाली काँग्रेसने वास्तवात फक्त 'इंडिया'चे हितसंबंध जपण्याचेच काम केले आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्हीही फॅसिस्टच. 'इंडिया'- अर्थशास्त्राचा पराभव होतो आहे असे पाहिल्यानंतर अधिक मागसलेली; पण परंपरेच्या कारणाने

पोशिंद्यांची लोकशाही / ३७