पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आठ-दहा जागांवर येऊन ठेपले. लोकन्यायालयालाच मानण्याची भाषा करणाऱ्याला लोकांनी तर आपला निर्णय दिलाच; पण आता काही आठवड्यांतच न्यायालयाचा आणि निवडणूक आयोगाचा याबद्दलचा निर्णय लागेल आणि महाराष्ट्राला लागलेली ही कीड संपून जाईल अशी आशा करायला हरकत नाही.
 देशपातळीवर भाजपही जास्त जबाबदारीने वागू लागेल अशी चिन्हे दिसत आहेत. अयोध्येचे राममंदिर प्रकरण कसे निकालात काढावे, यासंबंधी भाजपची नेतेमंडळी आता सौम्य भाषा वापरू लागली आहेत; सामंजस्याने किंवा न्यायालयाच्या निर्णयानुसार हा प्रश्न सोडवला पाहिजे असे म्हणू लागली आहेत. हीच भूमिका घेणाऱ्या विश्वनाथ प्रताप सिंग सरकारच्या भूमिकेविरुद्ध भाजपच्या याच नेतेमंडळींनी अकांडवतांडव केले होते. उत्तर प्रदेशचे शासन चालविण्याची जबाबदारी येऊन पडते आहे, हे पाहताच त्यांच्या अतिरेकीपणाला लगाम बसताना दिसतो. भाजप जातीय प्रश्नावर ऐतिहासिक कारणाने बदनाम आहे. ती दुष्कीर्ती दूर करणे त्यांना सहजपणे जमणार नाही; पण केन्द्रातील नवीन राजकीय परिस्थितीत भाजपचे परिवर्तन असंभव नाही. इंदिरा काँग्रेसने भाजपविरुद्ध कितीही हाकाटी केली तरी परिस्थितीत बदल घडणारच नाही असे नाही. संभाव्य पंतप्रधानांच्या यादीत माधवराव शिंदे यांचे नाव जवळजवळ अग्रक्रमाने आहे. शिंदे घराण्यातीलच दुसऱ्या दोन व्यक्ती भाजपच्या मान्यवर नेत्यांत आहेत. घरात पंतप्रधानपद येत असताना किरकोळ सैद्धांतिक वाद घालण्याची भारतीय पुढारी मंडळीत परंपरा नाही. यापूर्वीही काँग्रेसने सोईस्कर पडेल तेव्हा अगदी शिवसेनेशीही चुंबाचुंबी केली आहे; तर बदलत्या राजकीय परिस्थितीत नवीन भाजपशी सौहार्दाचे संबंध ठेवणे काही अशक्य नाही.

 जनता दलाच्या आणि इतर पक्षांच्या मंडळींनीही भाजपशी अगदी जवळचे स्नेहसंबंध ठेवले आहेत. ३० ऑक्टोबरच्या खडाष्टकाचा विसर पडायला कदाचित् काही वेळ लागेल; परंतु आम्ही त्यांच्या पंक्तीला अजिबात बसणारच नाही, या घोषणांत तथ्यापेक्षा नाटकच जास्त! मग इंदिरा काँग्रेस आदी पक्ष आणि भाजप यांचे एकमेकांचे संबंध आहेत तरी कसे? इंदिरा काँग्रेसचे नवे अध्यक्ष श्री. नरसिंह राव यांनी अध्यक्षपदावर येतायेताच एक मोठी चांगली मुलाखत पत्रकारांना दिली. सर्वसाधारपणे काँगेस अध्यक्षांच्या मुलाखती इतक्या नीरस आणि रटाळ असतात, की त्या वाचवतसुद्धा नाहीत; पण रावसाहेबांची ही मुलाखत निदान वाचनीय होती, चुरचुरीत होती यात काही शंका नाही. या मुलाखतीत नव्या अध्यक्षांनी एक मुद्दा मांडला. 'काँग्रेसला पर्याय फक्त फॅसिझमच'. फॅसिझम या

पोशिंद्यांची लोकशाही / ३६