पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ग्रामीण रोजगार हमी योजना, आरोग्य योजना, सर्व शिक्षा अभियान यांसारख्या योजना राबवायच्या, तर त्याच्या खर्चासाठी पैसे काही काँग्रेसच्या नेत्यांनी स्वित्झर्लंडमधील बँकांत ठेवलेल्या पैशातून येणार नाहीत, या सगळ्या कार्यक्रमांसाठी दिल्लीच्या सरकारी खजिन्यातूनच खर्च होणार आहे. आता हा खर्च होतो म्हणजे तरी नेमके काय होते? नियोजन मंडळाच्या एका समितीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे, की गरिबांच्या नावाने या तिजोरीतून ६५ रुपये बाहेर काढले, तर त्यातील फक्त १ रुपया गरिबांपर्यंत पोहोचतो. म्हणजे, 'आम आदमी'चे भले करतो म्हणत, त्यांच्याकडून मते घ्यायची, सत्ता मिळवायची आणि त्या सत्तेचा वापर करून, सरकारी तिजोरीतून ६५ रुपये काढून, त्यांतले ६४ रुपये स्वतःच्या खिशात घालायचे असा हा भामटेपणाचा कारभार 'आम आदमी' अर्थशास्त्राचा; मग त्यातून मंदीची लाट थोपवणे कसे शक्य होणार?
 त्याच्या ऐवजी 'पोशिंद्यांची लोकशाही' आली, तर मंदीची लाट थोपू शकते, बेरोजगारी संपू शकते असा मोठा धाडसी विचार स्वतंत्र भारत पक्षाने मांडला आहे. लोकांच्या मनामध्ये हे धाडस नाही, कारण त्याचीही किंमत द्यावी लागते ना! गांधीजींच्या मार्गाने मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत आपण दिलीच आहे - आपण सगळे नेभळट बनलो आहोत. आपण इतके नेभळट झालो आहोत, की आपल्याला आर्थिक संकटालाही तोंड देण्याची ताकद नाही आणि आंतकवाद्यांच्या संकटालाही तोंड देण्याची ताकद नाही.
 आणि त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी, जसे इंग्लंडमध्ये चेंबरर्लेनला पंतप्रधानपदी निवडून दिले, तसे फारसे आक्रमक नसलेले मनमोहन सिंह सज्जन गृहस्थ आहेत, शांत गृहस्थ आहेत, अभ्यासू गृहस्थ आहेत, असे म्हणून त्यांना पंतप्रधानपदी निवडून दिले; पण त्यामुळे जगाचा किंवा हिंदुस्थानचा इतिहास बदलला अशी कल्पना कोणी करून घेऊ नये.
 लोकसभेच्या या निवडणुकीत काँग्रेसला २०६ जागा मिळाल्या आणि त्यांना काही पक्षांच्या मदतीने साधारणपणे पाच वर्षे चालेल अशा तऱ्हेचे सरकार तयार करायची शक्यता तयार झाली; पण तुम्ही इतिहास विसरू नये. सगळ्यांच्या लक्षात आहे, की १९८४ मध्ये, जेव्हा शेतकरी संघटनेची महाराष्ट्र प्रचार यात्रा झाली, त्या वर्षी काँग्रेसला ४१२ म्हणजे या वेळेच्या दुप्पट जागा मिळाल्या होत्या. या वेळी काँग्रेसला फक्त २९ टक्के मते मिळाली, १९८४ मध्ये ४९ टक्के मते मिळाली होती. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत १९८४ मध्ये राजीव गांधींना ४९ टक्के मते आणि ४१२ जागा लोकसभेत

पोशिंद्यांची लोकशाही / ३४९