पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिळाल्या. सहानुभूतीवर मिळालेली मते कायमची असतात असे गृहीत धरू नये.
 मला काही देशाचा पंतप्रधान व्हायचे नाही किंवा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे नाही. मला देशाचे हित चिंतायचे आहे. त्यामुळे यापुढील काही महिन्यांमध्ये परिस्थिती काय असेल, ते देशाचा हितचिंतक म्हणून पुढे ठेवतो आहे.
 कायदेमंडळातील महिलांच्या आरक्षणाचे विधेयक संमत होईल, न होईल हे बाजूलाच राहू द्या. पण, आज पाकिस्तानात आतंकवादी आणि तालीबानी ज्या वेगात हातपाय पसरत आहेत आणि हिंदुस्थानच्या सरहद्दीकडे सरकत आहेत, हे पाहिले तर काँग्रसेची, नवीन संपुआची आणि मनमोहन सिंगांची जी 'भाई भाई' वादाची कल्पना आहे, ती टिकू शकेल आणि टिकली तर देशाचे भले होईल असे मला काही दिसत नाही. या 'भाई भाई' वादाच्या पाठपुराव्यामुळे १९६२ मध्ये हिंदुस्थानवर चीनचे आक्रमण झाले. कोणाशी भांडण काढू नये असे म्हणत आपण नेपाळ चीनला जवळजवळ देऊन टाकला, आता चीनने अरुणाचल प्रदेशासंबंधी राष्ट्रसंघातील सुरक्षा समिती (Security Council) कडे तक्रार केली आहे. तेव्हा आता देश 'भाई भाई' वादाने चालवायचा की पुरुषार्थाच्या मार्गाने याचा निर्णय घ्यायची वेळ आली आहे. पुरुषार्थाच्या आवाहनाने मते मिळणे कठीण आहे, हे मला माहीत आहे. (तिकडे शेतकरी मरे ना का!) आम्ही तुम्हाला ३ रुपये किलोने धान्य देतो म्हटल्यावर काँग्रेसला भरभरून मते देणारे 'भेकडपणा सोडा आणि पोशिंद्यांची लोकशाही स्थापन करून, पुरुषार्थाच्या मार्गाने राष्ट्र मोठे करूया,' असे आवाहन करणाऱ्या स्वभापला मते देणार नाहीत हे खरे आहे; पण केवळ मते मिळविण्याकरिता तुमच्या मनाला न पटणारी, तुमच्या विचारांशी न जुळणारी तडजोड तुम्ही जर केली तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही.
 गेल्या निवडणुकीच्या निकालाचा थोडा अर्थ सांगायचा तर आधीचीच भेकड जनता ही आता अधिकच घाबरून गेली आहे आणि म्हणून अडवाणी पंतप्रधान झाले तर काय सांगावे ? ते एकदम पाकिस्तानवर हल्ला करतील, दुसऱ्या कोणाच्या हाती राज्य गेले, तर ते चीनवर हल्ला करतील, तिबेटला चीनच्या मगरमिठीतून सोडवायचा प्रयत्न करतील - तसे नको बाबा. आता आमचे जे काही शांतपणे चालले आहे, ते तसेच चालू द्या असे म्हणणाऱ्या नेभळटांची संख्या वाढल्यामुळे काँग्रेस निवडून आली; पण त्यांचे राज्य फार काळ टिकणार

पोशिंद्यांची लोकशाही / ३५०