पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिले, तर हिंदुस्थानला कोणत्यातरी ॲडव्हेंचरमध्ये - धाडसी कारवाईमध्ये ते ढकलणार नाहीत. याचा अर्थ काय? दुसऱ्या महायुद्धात हिटलरची आक्रमकता वाढत असताना इंग्लंडचे पंतप्रधान चेंबर्लेन यांनी हिटलरशी सामोपचाराने वागावे अशी भूमिका घेतली आणि म्युनिचला जाऊन, त्याच्याशी करार करायचे ठरवले. त्या वेळी विन्स्टन चर्चिल हे एकमेव राजकारणी असे होते, की ज्यांनी सांगितले, की हिटलरशी तडजोड होऊ शकत नाही. आज आपण पुन्हा चेंबरर्लेनच्या मार्गाने जाऊन, आतंकवाद्यांशी तडजोड करून, त्यांच्याशी जुळवून घेता येते का, हे पाहतो आहोत.
 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये भाषण करताना, मी देशापुढील दोन मोठ्या समस्या मांडल्या.
 एक समस्या- आतंकवाद्यांच्या संकटाची. हिंदुस्थानातील लोकांची लढण्याची प्रवृत्ती नाही. हिंदुस्थानला अहिंसेच्या मार्गाने आणि सत्याग्रहाच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले, याचा आपल्याला फार आनंद वाटत होता. त्या स्वस्त स्वातंत्र्याची आता आपल्याला किंमत मोजावी लागते आहे. कारण त्या स्वस्त स्वातंत्र्यामुळे आपल्या माथी कचकड्याचे नेतृत्व बसले आणि इस्रायल, चीन ज्या तऱ्हेने धाडसाने साऱ्या जगामध्ये आपले स्थान निर्माण करीत आहेत, तसे न होता बुळकुंड्या लोकांचे राज्य आपल्याकडे तयार झाले.
 त्याशिवाय, कम्युनिस्ट व आतंकवादी यांची एक सत्ता तयार झाली आहे आणि ती सगळे जग काबीज करायला निघाली आहे.
 दुसरे संकट असे, की सगळ्या जगामध्ये आर्थिक मंदी आली आहे. या मंदीमुळे बँका बंद पडत आहेत, आपल्या ठेवी परत मिळतील की नाही, याची लोकांना चिंता पडली आहे; नोकऱ्या जात आहेत, बेकारी वाढते आहे. अशा परिस्थितीत बेकारी वाढायची नसेल, तर काय करायला पाहिजे?
 बेकारी वाढायची नसेल, तर जे लोक रोजगार देतात, त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, ही स्वतंत्र भारत पक्षाची भूमिका आहे, त्यांना प्रोत्साहन देण्याच्या व्यवस्थेला स्वभापने 'पोशिंद्यांची लोकशाही' म्हटले आहे. पण, संपुआच्या म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने त्याच्या उलट भूमिका मांडली, "जे लोक बेकारीमुळे संकटात सापडत आहेत, त्यांना सावरून घ्यायला पाहिजे, 'आम आदमीला' चांगले वाटावे अशा तऱ्हेची भूमिका घेतली, तर या आर्थिक संकटातून आपण पार पडू शकू."
 मी निवडणुकीच्या प्रचारात मांडले, की तुम्ही जर का 'आम आदमी'करिता

पोशिंद्यांची लोकशाही / ३४८