पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भूमिका घेऊन वागत नाही हे उघड आहे; पण त्यांना हळूहळू सोडून द्यावे अशी भूमिका नवीन अध्यक्षांनी मांडल्यानंतर टेलिव्हिजनवर या विषयावर उघड चर्चा झाली. पूर्वीचे उपाध्यक्ष चैनी आणि नवीन अध्यक्ष ओबामा यांनी त्यात भाग घेतला. नवीन अध्यक्षांनी म्हटले, "युद्धकैद्यांचा छळ करणे हे अमेरिकेच्या इतिहासात बसत नाही, तत्त्वज्ञानात बसत नाही." तत्त्वज्ञानात बसत नाही, हे कदाचित खरे असेल; पण दुसऱ्या महायुद्धातील जर्मनांशी संबंध असलेल्या नागरिकांना छावण्यात ठेवून, त्यांना किंवा व्हिएतनाममधील युद्धकैद्यांना कसे वागवण्यात आले, ते साऱ्या जगाला ठाऊक आहे. तेव्हा अमेरिकेचा इतिहास युद्धकैद्यांना मानवतेने वागवण्याचा नाही हे उघड आहे. ओबामांनी आणखी एक युक्तिवाद मांडला, "जर, आपण 'अल् कायदा'च्या कैद्यांना त्यांच्याकडून कबुलीजबाब किंवा माहिती काढण्याकरिता दुष्टपणे वागवले, त्यांचा छळ केला, तर आपले जे कैदी त्यांच्याकडे असतील, त्यांचासुद्धा अशाच तऱ्हेने तेथे छळ होईल." माझ्या असे लक्षात आले, की या एका कल्पनेने अमेरिकन नागरिकांमध्ये थरकाप झाला आहे, की आपल्यापैकी जे 'अल् कायदा'च्या हाती सापडतील त्यांचा असाच छळ झाला, तर काय करावे? प्रत्यक्षात स्थिती अशी आहे, की 'अल् कायदा'च्या हाती जे कोणी सापडले, ते काही लढणारे जवान होते असे नाही, त्यात काही पत्रकारही सापडले. ज्यांचा अमेरिकेच्या अफगाणिस्तानवरील किंवा इराकवरील हल्ल्याशी काहीही संबंध नव्हता. अशा लोकांनासुद्धा 'अलकायदा'च्या लोकांनी टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर तलवारीने मुंडकी छाटून खलास केले. हे असे असतानासुद्धा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष लोकांना सांगतो, की आपल्या लोकांचा छळ होऊ नये म्हणून आपण त्यांच्याबरोबर चांगले वागावे. याचा अर्थ असा, की अमेरिकेच्या अध्यक्षांनासुद्धा 'स्टॉकहोम सायकॉलॉजी'ने ग्रासले आहे - ते कोणत्या धर्मामध्ये, कोणत्या वंशामध्ये जन्मले याची चर्चा आवश्यक नाही.
 आणि मग, सगळ्या जगातील आतंकवादाचा सामना आक्रमकपणे न करता, शांतपणे करावा आणि त्याकरिता जास्तीत जास्त शांतपणे वागण्याची शक्यता कोणात आहे, हे पाहून अमेरिकेतील लोकांनी मतदान केले.
 त्याचप्रमाणे, हिंदुस्थानातील लोकसभा निवडणुकीतही लोकांनी घाबरून जाऊन मतदान केले आहे. पंतप्रधानपदाची हाव लागलेल्या लोकांचे काय सांगावे? ते कशा पद्धतीने निर्णय घेतील ते, त्याच्यापेक्षा ज्यांचा काही इतिहास आहे - अभ्यासूपणाबद्दल, सौजन्याबद्दल इतिहास आहे, अशा माणसांना मत

पोशिंद्यांची लोकशाही / ३४७