पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जास्त उमेदवार निवडून आले, ते पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये, म्हणजे महेंद्रसिंग टिकैत यांच्या भूमीत. त्यानंतर भाजपला यश मिळाले ते गुजराथमध्ये. महात्मा गांधींबद्दल आपुलकी, प्रेम, आदर आणि अभिमान बाळगणाऱ्या गुजरातने जातीयवादी भाजपच्या पाठीमागे उभे राहावे हे दुर्दैव तर खरेच; पण त्यात एक भीषण विनोदही आहे. पुण्याचे भाजपचे उमेदवार अण्णा जोशी निवडून आल्याचे जाहीर झाले आणि सगळीकडे तशी गुलालफेकीची मोठी मिरवणूक निघाली. त्यात अण्णा जोशींच्या जयजयकाराच्या घोषणा होत्याच; पण त्यचबरोबर मोठी ठळक घोषणा 'नथुराम गोडसे अमर रहे।' अशी होती. बापूंचा गुजराथ आणि नथुरामचे पुणे यांचा हा संगम मोठा विदारक आहे.

 सुदैवाने महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेच्या पसरत्या साथीला चांगला आवर बसला आहे. किंबहुना, निवडणुकीच्या निकालात त्यातल्या त्यात आनंदाची अशी एक बाब, की शिवसेनेचा माज उतरला आहे. महाराष्ट्रातील या घटनेस अनेक कारणे आहेत. जनता दल महाराष्ट्रात नगण्य असल्यामुळे विरोधी मतांची फारशी फाटाफूट झाली नाही आणि बहुतेक ठिकाणी इंदिरा काँग्रेसविरुद्ध युती असा सामना झाल्याने जातीयवादी तत्त्वांना आवर बसला; पण याहीपेक्षा एक कारण जास्त महत्त्वाचे असावे. मुंबई उच्च न्यायालयाने एकामागोमाग एक निर्णयात शिवसेना आमदार-खासदारांच्या निवडणुका रद्द ठरवल्या. एवढेच नव्हे, तर 'गर्व से कहो हम हिंदू हैं।' हे निवडणुकीतील प्रचारवाक्य अग्राह्य ठरवले. न्यायालयाच्या निर्णयांच्या आधाराने निवडणूक आयोगासमोरे शिवसेनेची मान्यताच रद्द करण्याचा प्रस्ताव सुनावणीसाठी घेण्यात आला आहे आणि या प्रकरणाची सुनावणी निवडणुकीनंतर लगेच होणार आहे. या दोन्ही घटनांमुळे युतीच्या प्रचाराची शैली बदलली. 'आम्ही' कोणाला मानीत नाही, कोर्टाचेही 'ऐकणार नाही' अशी गुर्मीची भाषा बंद पडून, अगदी बाळासाहेब ठाकरेंची भाषणेसुद्धा युक्तीयुक्तीने आणि मोजून मापून होऊ लागली. काही ठिकाणी काही मुद्द्यांवर बेताल विधाने केली गेली; पण एकूण सावधगिरीचा पवित्रा शिवसेनेस घेणे भाग पडले. त्यामुळे त्यांच्याभोवती तयार झालेले खोटे तेजोवलय गळून पडले. कुणाची भीडमुर्वत न ठेवता परखडपणे बोलणारे सेनापती काव्याकाव्यानेच हिंमत दाखवतात, हे अनेकांनी डोळ्यांनी पाहिले आणि कानांनी ऐकले. या वाघात मोहरमच्या वाघापेक्षा शौर्य नाही याची जाणीव लोकांस होऊ लागली आणि बेलगाम अफाट भाषणे करणाऱ्या साध्वी आणि संन्यासी यांच्या ताफ्यानेही फारसा फरक पडला नाही. पंचवीसतीस जागा मिळवण्याच्या वल्गना करणारे

पोशिंद्यांची लोकशाही / ३५