पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 निवडणुकीची पद्धत भली विक्षिप्त असो, देशातील निवडणूक आयोगाने निवडणुका घडवून आणण्याची यंत्रणा इतकी चांगली ठेवली आहे, की जगातील अनेक सुधारलेले देशसुद्धा हिंदुस्थानातील निवडणुका ज्या शिस्तीने आणि सर्वसाधारण शांततेने पार पडतात, तो एक चमत्कारच मानतात.
 भारतातील निवडणुका या भारतातील शिरगणतीप्रमाणे एक अतिप्रचंड अभियान असते. शेषन साहेब निवडणूक आयोगाचे आयुक्त झाले आणि त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वास अनुसरून इतिहासात आपले एक स्थान बनवले. मतदारांना छायाचित्रांसहित ओळखपत्र देणे, निवडणूक खर्चावर बारकाईने देखरेख ठेवणे, त्यासाठी व्यापक प्रमाणावर सर्व निवडणूक कार्यवाहीचे दृक्-श्राव्य चित्रण करणे... या सुधारणा यशस्वीपणे अमलात आल्या. त्यानंतर मतदान पेट्या काढून टाकून, त्या जागी आधुनिक मतदान यंत्रे भारतासारख्या बहुतांश अशिक्षित नागरिकांच्या देशातही सहज रुजली. इलेक्ट्रॉनिक यंत्राची व्यवस्था अनेक विकसनशील देशांतही नाही याचा भारतीयांना अभिमान वाटणे साहजिक आहे.
 एवढ्या सगळ्या सुधारणा करूनही, निवडणूक यंत्रणा ही काही भ्रष्टाचाराने बरबटलेल्या देशात स्वच्छतेचे चिमुकले बेट राहू शकत नाही, हे उघड आहे.
 नेहरूप्रणीत समाजवादामुळे लायसन्स परमिट-कोटा राज्य आले. त्यातून नेता, तस्कर, गुंडा, अफसर यांच्या हाती मोठ्या वेगाने सत्ता येऊ लागली. काही काळ गुंडांनी नेत्यांची बाहुली नाचवली आणि थोड्याच काळात ते स्वतःच नेत्याच्या रूपात राजकारणाच्या रंगभूमीवर अवतरले.
 निवडणूक प्रचारासाठी तिनेक आठवडे मिळत असल्यामुळे झेंडे, पताका, जाहिराती, मिरवणुका यांचा एकच जल्लोष करून, निवडणुकीच्या निर्णयावर प्रभाव पाडणे गुंड मंडळींना सहज जमू लागले. वर्षानुवर्षे जनसेवेची तपस्या केलेल्या उमेदवाराला धनदांडगे उमेदवार, आवश्यक तेथे हिंसाचार आणि गुंडागर्दीचा वापर करून, मागे टाकू लागले. विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही प्रतिनिधिगृहांत गुंड, दादा, दरोडेखोर, बलात्कारी आणि भ्रष्टाचारी यांचे प्रमाण वाढत चालले. संसद हे चर्चेचे व्यासपीठ न राहता, कुस्तीचा आराखडा बनू लागले. यावर उपाययोजना काय करावी ? गुंड उमेदवाराचा बंदोबस्त करणे हा काही केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रश्न नाही. लायसन्स- परमिट-कोटा व्यवस्थेमुळे, दीडशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी बंदोबस्त केलेल्या ठग, पेंढारी यांची सद्दी सर्वत्र चालू झाली. त्यात निवडणुका जिंकण्यासाठी मतदारांना लालूच दाखवण्याच्या अनेक पद्धती रूढ होऊ लागल्या. पक्षाचा विचार काय,

पोशिंद्यांची लोकशाही / ३३९