पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ध्येय-धोरणे काय, यापेक्षा कोणता पक्ष काय आश्वासने देतो याचा निवडणुकीवर अधिक प्रभाव पडू लागला. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या ४० वर्षांतच सर्व देशाचे समग्र भले करणारा कोणी पक्ष किंवा नेता पुढे येईल, ही लोकांची अपेक्षाच संपुष्टात येऊन गेली. युद्धात हरलेल्या सैन्याप्रमाणे जो तो मतदार आपला जीव कसा वाचवता येईल, याचाच हिशेब करू लागला. मतांची खुलेआम विक्री सुरू झाली. मतदानाच्या आदल्या रात्री होणाऱ्या पैशाच्या वाटपावर, दारू, भांडीकुंडी, लुगडी यांच्या वाटपावर निकाल ठरू लागले. एवढे पुरेसे नाही म्हणून की काय, मतदारांना लुभावण्यासाठी २ रुपये किलो तांदूळ यांसारख्या वेगवेगळ्या योजना यांचा मतदारपेढ्या (Votebanks) विकत घेण्यासाठी खुलेआम वापर होऊ लागला. हा प्रकार आजही चालू आहे. अगदी अलीकडेच सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे रोजगाराचे दिवस आणि रोजगाराचा दर वाढवून दिला जाईल अशी खुलेआम घोषणा केली. ज्या राजकीय पदांसाठी निवडणुका घ्यायच्या, त्या पदांचाच वापर करून, मतदारांना विकत घेण्याचा हा कार्यक्रम किती रुळला आहे, हे पाहिले म्हणजे समाजवाद आणि लोकशाही एकत्र नांदू शकत नाही हा सिद्धांत स्पष्ट होतो.
 समाजवादाचा भारतीय लोकशाहीवर याहूनही मोठा दुष्परिणाम झाला, तो म्हणजे शेतीचे शोषण, त्या आधारे होणारी शहरांची बेसुमार वाढ आणि बकाली वस्त्यांचा सर्वदूर प्रादुर्भाव. शहरातील बकाली वस्त्यांमध्ये ज्या समाजांना समाजाच्या मध्य प्रवाहात स्थान मिळत नाही, अशांचीच दाटी होते. बहुतेक शहरांत अशा वस्त्यांत दलित, आदिवासी, मुसलमान आदी अल्पसंख्य समाजांचाच जास्तीत जास्त भरणा असतो. या वस्त्या बहुधा बेकायदेशीरच असतात. तेथील झोपडीवाल्यांना केव्हा उठवून दिले जाईल, याचा काहीच भरवसा नसतो. तुमची झोपडपट्टी आम्ही उठवू देणार नाही, एवढ्या आश्वासनावरच या वस्त्यांतील एकगठ्ठा मते मिळवता येतात. अलीकडच्या निवडणुकीत प्रलोभनांपेक्षा झोपडपट्ट्या आणि गलीच्छ वस्त्या यांतील मतदारांच्या झुंडीच्या झुंडी मतदानकेंद्राकडे कोण घेऊन जाऊ शकतो, यावरच निवडणुकांचे निकाल अवलंबून असतात.
 या परिस्थितीवर तोडगा काढण्याचा निवडणूक आयोगाने प्रयत्न केला नाही असे नाही. उमेदवारीचे अर्ज भरतानाच प्रत्येक उमेदवाराने आपली मालमत्ता, शिक्षण आणि गुन्हेगारी यांबद्दल शपथपत्र दाखल करावे अशी व्यवस्था करण्यात आली. देशभर माजलेले गुंड शपथपत्रात आपली खरीखुरी माहिती देतील, ही

पोशिंद्यांची लोकशाही / ३४०