पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्या कारभारावर आंतरराष्ट्रीय देखरेखीची व्यवस्था होती. या व्यवस्थेत आंतरराष्ट्रीय चलन म्हणून सोन्याबरोबरच अमेरिकन डॉलरलाही मान्यता मिळाली. जगभरच्या देशांच्या डॉलरभुकेला काही अंतच नव्हता. ज्याला त्याला डॉलर हवे होते. जगभरात डॉलर किती असावेत याचे नियंत्रण अमेरिकेतील 'फेडरल रिझर्व्ह' या संस्थेकडे होते. या संस्थेवर कोणत्याही प्रकारचे जागतिक नियंत्रण नव्हते. अमर्याद प्रमाणात डॉलर छापून, स्वस्त मनुष्यबळाच्या देशातून सर्व तऱ्हांचा माल स्वस्तात मिळवता येतो हे लक्षात घेऊन डॉलरछपाई यंत्रणा काम करू लागली. भारतासारख्या देशातील गरिबी कमी जाचक झाली, उद्योजकता वाढली याचे पुष्कळसे श्रेय या डॉलरछपाईला आहे.
 ३) या व्यवस्थेचा श्रीमंत देशांवरही काही विपरीत परिणाम घडून आला. नोकऱ्या मिळतात, पगार सतत वाढत असतात अशी भावना झाल्यामुळे काटकसर संपुष्टात आली. भविष्यात येणाऱ्या मिळकतीच्या अपेक्षेने आणि हिशेबाने जनसामान्य गुंतवणुकीचे निर्णय करू लागले. याचा मुख्य परिणाम मोटारगाड्या आणि गृहबांधणी या क्षेत्रात दिसून आला. ज्यांच्याकडे काहीच शिल्लक नाही अशा लोकांनी भविष्यातील मिळकतीच्या अपेक्षेने कर्जे काढून, गुंतवणूक करायला सुरुवात केली म्हणजे मोठी स्फोटक परिस्थिती तयार होते. एखाददुसऱ्या वित्तीय संस्थेने थोडीशी गोलमाल केली तरी घबराट सुरू होते. घबराटीमध्ये बिनआधाराच्या कर्जाची खुले-आम बाजारपेठ उघडते आणि थोड्याच काळात मोठमोठ्या वित्तीय संस्था दिवाळखोर बनतात.
 भारतीय अर्थव्यवस्थेचे खंबीरपण
 भारतात त्या मानाने अजून परिस्थिती बरी आहे. डावे पक्ष याचे श्रेय स्वतःकडे लाटून घेऊ पाहत आहेत. आपल्या आग्रहावरून परदेशी गुंतवणूक आणि निधी यांवर मर्यादा घालणे संपुआ शासनाला भाग पडले; यामुळेच भारत अद्यापतरी तुलनेने सुरक्षित आहे अशी त्यांची कुर्रेबाजी आहे.
 भारताच्या प्रगतीचे श्रेय जसे कोणत्याही राजकीय प्रणालीला नाही; उद्योजकांच्या धडाडीला आणि तंत्रज्ञांच्या बुद्धिमत्तेला आहे, तसेच जागतिक मंदीच्या तडाख्यात देश अजून डोके वर काढून आहे याचे श्रेय भारतीयांच्या परंपरागत नैतिकतेला आणि काटकरीच्या सवयींना आहे. जेथे राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या २० टक्क्यांवर बचत होते त्या देशाची मूलभूत अर्थव्यवस्था खंबीर राहील.
 पण, एवढे सांगितल्याने मतदारांचे समाधान होणार नाही. त्यांना कोणा

पोशिंद्यांची लोकशाही / ३३४