पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंबीर अधिकारी व्यक्तीने 'नेहरूप्रणीत समाजवादातून सुटका योग्यच होती, उदारीकरण आणि जागतिकीकरण हे इतिहासलब्ध प्रकाशात उचित आणि अपरिहार्य होते,' असे निक्षून सांगण्याची आवश्यकता आहे.
 मंदी : एक संधी
 प्रत्येक संकट ही एक संधीही असते. सध्याची मंदी गेल्या दोन दशकांत जी वारेमाप उधळपट्टीची वाढ झाली, त्या बाबतीत शिस्त आणण्यासाठी मिळालेली एक संधी आहे. या दृष्टीने या मंदीकडे पाहिले पाहिजे.
 समाजवादाच्या काळात कोळपून गेलेल्या अर्थव्यवस्थेला नव्याने पालवी फुटली, वृक्ष वाढू लागला आणि पहिल्या पानगळीची वेळ आली आहे. पानगळ हे वाढीचे लक्षण आहे हे शेतकऱ्यांना समजते, इतर मतदारांनाही हे समजावून सांगावे लागणार आहे.
 समाजवादाच्या काळात देश अळीप्रमाणे सरपटत चालला होता. खुलीकरणानंतर तो कोशातून पंख घेऊन बाहेर पडला आहे. उडण्यासाठी पंख वरखाली करणे आवश्यक आहे. खुल्या अर्थव्यवस्थेतील तेजीमंदी पक्ष्याच्या पंख वरखाली हलवण्याप्रमाणे असते.
 अगदी गरुड पक्ष्याची झेप घेतली, तरी त्यालादेखील मधूनमधून खाली उतरून झाडाच्या फांदीवर विश्रांतीसाठी थांबावे लागते. 'गरुडालाही खाली यावेच लागते. मग अळीसारखे जगण्यात दोष तो काय?' अशा तऱ्हेचा युक्तिवाद या निवडणुकीत डावे करणार आहेत. त्याला मतदारांनीच सडेतोड उत्तर द्यायचे आहे.
 खुल्या बाजाराच्या आकाशात पहिली झेप घेण्यास तयार झालेले पक्ष्याचे पिलू सुरुवातीस, साहजिकच, लवकरच दमले. याच पिलाच्या पंखांत आणि छातीत यथाकाल ताकद येईल. कोणत्याही परिस्थितीत पिलाला घाबरून उबदार घरट्यात बसू देणे निसर्गक्रमाच्या विरुद्ध होईल. मतदार पक्षिणींनी सुस्तावणाऱ्या राजकीय नेत्यांना घरट्याबाहेर ढकलून देऊन, त्यांना पुरुषार्थाचे धडे देणे आवश्यक आहे.
 मतदारांची जबाबदारी
 जमिनीवर सरपटणारा देश पहिल्यांदा पाण्यात उतरला आहे. नाकातोंडात थोडसे पाणी गेल्यामुळे घबराट झाली आहे. त्याला धीर देण्याची जबाबदारी मतदारांनी पार पाडायची आहे.
 २००९ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आणि त्यानंतर येणाऱ्या

पोशिंद्यांची लोकशाही / ३३५