पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोठी चालना मिळाली. गणकयंत्रातील हार्डवेअरच्या क्षेत्रात आम्ही साऱ्या जगाच्या पाठीमागे; पण सॉफ्टवेअरमध्ये आमची कारकुनी बुद्धी थोडी चालली आणि तेवढ्याच बळावर आमच्या चार-पाच कंपन्या जगभर नाव मिळवून गेल्या. 'मोबाइल'च्या क्षेत्रातही हीच परिस्थिती आहे. त्यातीलही इलेक्ट्रॉनिक शास्त्राबद्दल या उद्योगातील लोकांना जाण कमी. मोबाईल बाळगणाऱ्या सर्वांनाच कधी ना कधी याचा अत्यंत कडू अनुभव आलेलाच असतो आणि तरीही भारत मोबाइल सेवांच्या बाबतीत अनेक विकसित देशांच्याही पुढे आहे.
 अलीकडचा 'सत्यम्' घोटाळा मोठा बोलका आहे. कंपनीच्या ताळेबंदात आकड्यांशी खेळ करून सगळे काही आलबेल आहे असा आभास निर्माण करण्यात आला; पण एक दिवस फुगा फुटला आणि अर्थव्यवस्था शेअरबाजार दोन्ही हादरले. ताळेबंदातील लपवाछपवी शेकडो कोटी रुपयांची होती. मोबाइल सेवा देणारे प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक कॉलमागे किती फसवतात, हे अजून प्रकाशात आलेले नाही. सत्यम् चा स्फोट होऊन गेला, मोबाईलचा विस्फोट होईल तेव्हा सर्वच लोकांचा बाजारव्यवस्थेवरील विश्वास मूठभर भामट्यांच्या उद्योगांमुळे डळमळेल.खुल्या व्यवस्थेकरिता मजबूत कायदा आणि सुरक्षाव्यवस्था आवश्यक आहे. पहिल्या भारतीय गणतंत्राची प्रकृती अशी व्यवस्था देण्याची नाही.
 जागतिक मंदीचे विश्लेषण
 शेतकरी आणि बिगरशेतकरी मतदारांनी, केवळ घबराटीमुळे, बाजारस्वातंत्र्याला विरोध करणारांना थारा देणे मोठी घोडचूक होईल.
 सध्याच्या जागतिक मंदीचे विश्लेषण अनेकांनी अनेक परींनी केले आहे. या मंदीची प्रमुख कारणे थोडक्यात अशी सांगता येतील :
 १) १९३० सालची जागतिक मंदी बाजारातील मागणीच्या अभावाने आलेली होती. त्यावर उपाययोजना म्हणून अर्थव्यवस्थेत 'येन केन प्रकारेण' पैसा सोडण्याचे हत्यार वापरले गेले. 'काटकसर हा वैयक्तिक गुण असेल; पण ती सामाजिक गुन्हा ठरू शकते,' ही विचारसरणी जनमनात रुजली. भांडवलशाहीच्या उद्गात्यांना ही कल्पना कधीही मान्य झाली नसती. भांडवलनिर्मिती ही उपभोगाच्या त्यागाने काटकसरीने केलेल्या बचतीने होते, हा भांडवलशाहीचा मूळ सिद्धांत अडगळीत गेला.
 २) दुसऱ्या महायुद्धानंतर उभ्या केलेल्या जागतिक अर्थ आणि नाणे व्यवस्थेमध्ये दोन प्रमुख संस्था तयार केल्या गेल्या. जागतिक बँक आणि

पोशिंद्यांची लोकशाही / ३३३