पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ताजे पुरावेच आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाची नैतिक जबाबदारी स्वीकारल्याचे नाटक करीत शासनाने एक फुटकीतुटकी कर्जमाफी योजना जाहीर केली. तिचा हेतू राजकीय पुढाऱ्यांच्या लुटीने वासे पोकळ झालेल्या सहकारी संस्थांना टेकू देऊन संजीवनी देणे हाच होता. या योजनेतून शेतकऱ्यांना काही लाभ होण्याची शक्यताच नव्हती, तो झालाही नाही. अलीकडे वित्तीय मंदीच्या लाटेला तोंड देण्यासाठी किंवा भामटेगिरीमुळे बुडणाऱ्या कंपन्यांना वाचवण्यासाठी सरकार किती उदारतेने पैशांचा पाऊस पाडते हे पाहिले म्हणजे शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी देणाऱ्या शासनकर्त्यांच्या आत्यंतिक शेतकरीद्वेषाची प्रचीती येते.
 आतंकवाद
 शेतकरी आणि बिगरशेतकरी या दोघांनाही भेडसावणारा एक भयानक प्रश्न आतंकवाद होय. ईशान्येकडील राज्यांत ख्रिस्ती धर्माच्या प्रभावाखाली फुटीरवादी आतंकवादी सक्रिय आहेत. देशभरातील दिडशेच्या वर जिल्ह्यांत गरिबांच्या कळवळ्याचा कांगावा करणारे नक्षलवादी अक्षरशः हुकमत गाजवत आहेत. याखेरीज, मुसलमान समजातील काही आतंकवादी अलीकडे घडलेल्या मुंबईवरील हल्ल्यांप्रमाणे जागोजाग उद्रेक घडवून आणीत आहेत. या आतंकवादाचे स्वरूप सुजाण मतदारांनी समजून घेणे आवश्यक आहे.
 कायदा व सुव्यवस्था
 ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य हिंदुस्थानात चालू झाले, त्या वेळी हिंदुस्थानभर अंमल चालू होता, तो ठगांचा आणि पेंढाऱ्यांचा. त्याखेरीज, जागोजाग आपापल्या जमिनींचे आणि जंगलावरील हक्कांचे रक्षण करण्यासाठी अनेक आदिवासी स्वतंत्रता नायक इंग्रजांशी टक्कर देत होते. ठग, पेंढारी आणि आदिवासी नायक यांच्या तुलनेने दिल्लीची बादशाही, मराठेशाही आणि संस्थानिक यांचा बंदोबस्त करण्यात इंग्रजांना फारशी तोशीस पडली नाही; पण ठग, पेंढारी आणि आदिवासी नायक यांना जनाधार फार किरकोळ होता. याचा फायदा इंग्रजांनी उठवला आणि त्यांना लुटारू, दरोडेखोर जाहीर करून, त्यांचा बीमोड करून टाकला. त्यांतील अनेक जमातींना गुन्हेगार किंवा भटक्या जमाती ठरवून टाकले. या जमातींच्या तांड्यांवर पोलिसांची कडक देखरेख राही आणि अनेकवेळा, अमानुष पद्धतींचा वापर करून त्यांच्यातील नेतृत्वाचा बीमोड केला जाई.
 इंग्रजांची ही कारवाई मोठी प्रशंसनीय होती असे कोणीच म्हणणार नाही. पण, त्यामुळे देशात कायदा आणि सुव्यवस्था यांचे राज्य प्रस्थापित होऊन

पोशिंद्यांची लोकशाही / ३२६