पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खानदानाशी निष्ठावंत आहेत याकरिता मोठेपण दिले. जन्माच्या अपघाताने निवडलेल्या लोकांच्या हाती सत्ता गेली तर देशाचे वाटोळे व्हावे हे साहजिकच आहे. सोनियाजी स्वतः ख्रिश्चन धर्माच्या, हिंदु संस्कृती ही मागासलेल्या अडाणी लोकांची आहे असे शिकवणाऱ्या समाजाच्या.
 देशाच्या या अधःपाताची मुख्य जबाबदारी गावातील शेतकरी समाजाची आहे. ६० टक्क्यांच्या वर असलेला समाज एकसंघ राहिला असता, जो पक्ष शेतकऱ्यांचे भले करील त्याच्या हातीच राजमुकट सोपवणारा झाला असता, जातीपातीच्या, नात्यागोत्याच्या आधाराने आणि प्रलोभनाला बळी पडून मत देणारा झाला नसता तर राज्यसत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला दलित, आदिवासी, मुसलमान यांच्यापुढे नाकदुऱ्या काढाव्या लागल्या नसत्या. केवळ राष्ट्रप्रेमी शेतकऱ्यांच्या ताकदीवर कोणताही पक्ष सत्तेवर येऊ शकला असता. पण, असे झाले नाही.
 महाराष्ट्रातीलच स्थिती पाहा. आघाडीतील काँग्रेस पक्षाने २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते, कापसाला प्रती क्विटल २७०० रुपयांचा भाव देण्याचे जाहीर केले होते. आश्वासन पुरे करता आले नाही तर समजू शकेल; पण, 'मते मिळवण्यासाठी निवडणुकीच्या आधी अशी खोटी आश्वासने द्यायचीच असतात' असे सांगून आपला हेतूच अप्रामाणिक असल्याची ग्वाही देणाऱ्या पक्षाबद्दल शेतकऱ्यांच्या मनात राग नाही. गेल्या निवडणुकीत काँग्रेसविरुद्ध प्रचार करून विरोधी पक्षांच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार, खासदार त्या पक्षांशी बेइमानी करून काँग्रेसमध्ये जातात, ज्यांच्यावर कठोर टिकेचे आघात केले त्यांचेच पाय चाटतात आणि तरीही, मागील निवडणुकीतील आपल्या अप्रामाणिकपणाची उघडउघड ग्वाही देणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर प्रचंड मताधिक्याने पुन्हा निवडून येतात.ते कसे निवडून येतात हे सर्वश्रुत आहे. सर्व दलित, आदिवासी, मुसलमान वस्त्यांत आणि कामगारांच्या झोपडपट्ट्यांत आता गुंडांचे राज्य प्रस्थापित झाले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी त्या त्या वस्त्यांतील गुंडांच्या टोळीप्रमुखांना विकत घ्यावे लागते. हे एकदा केले की संपुआप्रणीत जन्माधिष्ठित मागासवर्गीय हिरीरीने जाऊन मतदान करतात. याउलट, शेतकऱ्यांना आपल्या अपमानास्पद जिण्याचे दुःख नाही, आपले भाऊबंद हजारोंनी आत्महत्या करतात याची खंत नाही; जातीपाती, नातीगोती, प्रलोभने आणि जुन्या निष्ठा यांच्या आधाराने ते मतदान करतात आणि शेतकऱ्यांच्या शत्रूंनाच निवडून आणतात; एवढेच नव्हे

पोशिंद्यांची लोकशाही / ३२०