पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हल्ला करणाऱ्या आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व न्यायालयांत दोषी सिद्ध होऊन फाशीची शिक्षा झालेल्या अफजल गुरु याला फाशी दिली तर भयंकर गंभीर परिणाम होतील असा इशारावजा सल्ला काँग्रेसचे मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद देतात. केरळ राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष अफजल गुरु आणि ओसामा बिन लादेन यांची चित्रे उघडपणे मिरवतात. ही काही धर्मसहिष्णुतेची लक्षणे नाहीत, अनुरंजनाचीही नाहीत; हिंदुत्वाला विरोध करण्याच्या भरात जातीयवादी मुसलमानांना प्रोत्साहन देऊन भडकवण्याचे हे काम आहे.
 संपुआची अशी धोरणे चालली, तर ईशान्य ते अग्नेय असा उभा पट्टा चीनच्या वर्चस्वाखाली येईल आणि वायव्येकडील भाग पाकिस्तानला सहज गिळंकृत करता यावा अशी भूमी तयार होऊन जाईल. उत्तरेतील मध्यभाग हा आरक्षणवादी ताकदींच्या हाती जाईल. उरलासुरला दक्षिणेतील आणि पश्चिमेतील भाग एवढाच काय तो भारत या नावाने शिल्लक राहील.
 १९४७ सालच्या फाळणीपेक्षा ही संपुआपुरस्कृत फाळणी, हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणाला तोंड देऊन तग धरून राहिलेल्या भारतवर्षाला पृथ्वीच्या नकाशातून खोडून टाकील.
 एका बाजूस भारताला महासत्ता बनवून देदीप्यमान बनवण्याचा कार्यक्रम आखणारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि दुसऱ्या बाजूला देशाची सर्व ऐतिहासिक अभिमानस्थळे नष्ट करून देशाचे तुकडेतुकडे करण्यास सज्ज झालेली संयुक्त पुरोगामी आघाडी असे चित्र आहे.
 हे असे का घडले? याला जबाबदार कोण? घराणेशाही चालवण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने प्रेरित झालेल्या सोनिया गांधींचा हा दोष मानता येणार नाही. त्यांच्या परिस्थितीत, पतीची हत्या झाल्यानंतर, त्यांचे खानदान ज्या पक्षाबरोबर शंभराहून अधिक वर्षे जोडले गेले आहे त्या पक्षाला पुन्हा वैभवाचे दिवस दाखवावे अशी महत्त्वाकांक्षा त्यांनी जोपासावी यात अनैसर्गिक काहीच नाही. खरी जबाबदारी दोन गोष्टींवर ठेवता येईल.
 पहिली म्हणजे, भारतीयांची राजवंशांवर निष्ठा ठेवण्याची प्रवृत्ती. देशात अनेक कर्तबगार नायक होऊन गेले. सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, डॉ. राममनोहर लोहिया, लाल बहादूर शास्त्री, चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्यासारख्यांना जनतेने अव्हेरले आणि काही व्यासंग नाही, तपस्या नाही, राष्ट्रसेवेचा अनुभव नाही अशा लोकांना एकामागोमाग एक, ते केवळ नेहरू-गांधी खानदानातील किंवा त्या

पोशिंद्यांची लोकशाही / ३१९