पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३०५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राष्ट्रांना त्यांची शेतीवरील अनुदाने कमी करण्यास भाग पाडण्यासाठी गरीब आणि विकसनशील राष्ट्रांनी एक आघाडी बनवली आणि 'विकासाचा कार्यक्रम स्पष्ट केल्याखेरीज जागतिक व्यापार संस्थेला परिपूर्ण मूर्त स्वरूप येऊ शकणार नाही,' ही गोष्ट स्पष्ट केली. गोध्रा रेल्वे स्थानकावर अयोध्या कारसेवकांच्या आगगाडीचा डबा काही समाजघातकी लोकांनी जाळला. त्यानंतर, साहजिकच, गुजराथ राज्यभर जातीय दंगली उसळल्या. मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येचे प्रमाण गुजराथेतील या दंगलीत इतरत्रच्या दंगलीपेक्षा उलटे होते. याचा फायदा घेऊन, भाजपला तो जातीयवादी पक्ष असल्याचा गडद बाट लागला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानकीच्या कारकिर्दीच्या शेवटाशेवटास राष्ट्रीय उत्पादनवाढीचा दर १०.३% या उच्चांकावर गेला. रालोआच्या कालावधीतच उत्पादनाच्या वाढीचा ३% हा पंडिती दर इतिहासजमा झाला आणि ८% च्या आसपास वार्षिक उत्पादनाच्या दराचे युग साकारले.
 दुर्दैवाने, रालोआला गुजरातच्या दंग्यांचा कलंक लागला, त्याबरोबरच 'उत्पादनवाढीची गती वाढली तरी गोरगरिबांना त्याचा काही फायदा झाला नाही,' असा प्रचार करण्यात रालोआविरोधी शक्तींना यश आले. चंद्राबाबू नायडू यांना, आपण जणू आंध्र प्रदेशाचे महानिदेशक आहोत असे दाखवण्याची, मोठमोठे समारंभ घडवून आणण्याची आणि केवळ कॉम्प्युटरचाच उदेउदे करण्याची शैली भोवली. तामिळनाडूत जयललितांनाही आपली प्रतिमा सांभाळता आली नाही. उत्तर प्रदेशातही आरक्षणवाद्यांनी डोके वर काढले. या तीन राज्यांत पीछेहाट झाल्यामुळे २००४ च्या निवडणुकीत रालोआला लोकसभेत मिळालेल्या जागा काहीशा कमी झाल्या. काँग्रेस पक्ष हा सर्वांत अधिक जागा मिळालेला पक्ष म्हणून पुढे आला.
 काँग्रेस कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करणार नाही असा फणकारा दाखवणाऱ्या सोनियाबाईंनी आघाडीच्या धर्मापुढे लोटांगण घातले. या वेळी पुनश्च रालोआचीच सत्ता आली तर काँग्रेस पक्षाचे अखिल भारतवर्षातून उच्चाटन होईल हे उघड दिसत होते. त्यामुळे, 'येन केन प्रकारेण' त्यांनी एक आघाडी बनवण्यास सुरुवात केली. लालुप्रसाद यादव, अनेक लफड्यांत आणि खटल्यांत अडकलेले, बिहारमधील सत्ता कशीबशी सांभाळून होते. केंद्रात सत्तास्थानी असणे त्यांना आवश्यक होते; अन्यथा, त्यांची ससेहोलपट झाली असती. लालू सोनियाजींपुढे नतमस्तक झाले. पूर्वेकडे बांगलादेशातून आलेल्या निर्वासितांचे आगतस्वागत करून, त्यांच्या ताकदीतून ३० ते ४० मतदारसंघ कम्युनिस्ट

पोशिंद्यांची लोकशाही / ३०७