पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३०६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पक्षांनी ताब्यात घेतले होते. अर्थकारणात आणि शिक्षणक्षेत्रात मुसलमान दलितांपेक्षा दलित आहेत. त्यातील बहुतेकांच्या मनात हिंदू समाजाविषयी विखार आहे. त्याचा उपयोग करून कम्युनिस्टांनी पश्चिम बंगाल ताब्यात ठेवला होता. रालोआतील बहुतेक पक्षांना बांगलादेशीयांची ही घुसखोरी, त्यांचा पाकिस्तानकडील कल आणि त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला निर्माण होणारा धोका मान्य नव्हता. चंद्राबाबूंची शासनशैली आणि प्रमोद महाजन यांची 'इंडिया शायनिंग' ही घोषणा यांमुळे रालोआ फक्त 'आहे रे'ची पक्षपाती आहे, त्यात गरिबांसाठी ओलावा नाही असा कम्युनिस्टांनी कांगावा केला. तसे इंदिरा गांधींच्या काळापासूनच कम्युनिस्ट व काँग्रेस यांचे 'लफडे' चालूच होते. परंपरागत काँग्रेसविरोधी भूमिका सोडून, कशाचीही तमा न बाळगता, ते उत्साहाने सोनियाबाईंना सामील झाले; ते झाले म्हणून केरळातील कम्युनिस्टही झाले आणि, मौलाना मुलायमसिंग यांच्या समाजवादी पक्षाने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला कम्युनिस्टांप्रमाणेच बाहेरून पाठिंबा देत राहण्याचा निर्णय केला. एवढी जमवाजमव होते आहे असे दिसल्यावर राष्ट्रवादीच्या शरद पवारांना, बारा घोडे दूर जोडूनसुद्धा, संपुआपासून दूर खेचता आले नसते. सोनिया परदेशी मुळाच्या असल्यामुळे त्यांनी पंतप्रधान होऊ नये या मुद्द्यावर शरद पवारांनी काँग्रेसशी फारकत घेतली आणि आपण राष्ट्रवादी आहोत असा गहजब केला. २००४ च्या निवडणुकीत प्रचारामध्ये राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सोनिया गांधींवर अर्वाच्य टीका केली होती. पण, सत्तेच्या जवळ राहण्यासाठी आदिलशहाच्या किंवा दिल्लीश्वरांच्या दरबारात कुर्निसात घालण्याची मराठा सरदारांची परंपरा शरद पवारांनी राखली आणि राष्ट्रवादी काँग्रेस 'संपुआ' वासी झाली.
 सर्वांत विलक्षण प्रकार द्रमुक पक्षाचा. करुणानिधी आणि त्यांचे अनेक सहकारी तामीळ वाघांशी संबंध ठेवून आहेत, ते त्यांना आश्रयही देतात, मदतही करतात हे सर्वज्ञात आहे. राजीव गांधींच्या हत्येत तामीळ वाघांबरोबरच द्रमुकची मंडळीही होती. प्रत्यक्ष खुन्यांनाही त्यातील काहींनी आपल्या घरी आसरा दिला होता. हा सगळा इतिहास बाजूला ठेवून सोनियाजींनी आर्जवे करून, द्रमुकला संपुआत ओढून घेतले. कारण, सोनिया आणि जयललिता समान प्रकृतीच्या असल्यामुळे त्यांचे जमण्यासारखे नव्हते ही एक शक्यता किंवा रालोआने जयललिताबरोबर जाण्याची घोडचूक केली ही दुसरी गोष्ट. संपुआ सरकारच्या काळात राजीव गांधी हत्याप्रकरणात फाशी सुनावलेल्या अपराध्यांची शिक्षा सतत पुढे ढकलण्यात येत आहे हेही मोठे सूचक आहे. खुन्यांना घरी आसरा

पोशिंद्यांची लोकशाही / ३०८