पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२९६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असा आग्रह धरत नाही. माझी चिंता एकच आहे, की अशा विजयासाठी मला वजा करण्याचा विचार करताना, कोणत्याही पुढच्या निवडणुकांच्या वेळी म्हणा, प्रशिक्षण शिबिरात म्हणा किंवा सभांत म्हणा आतापर्यंतची 'शरद जोशी' या विचाराची जी परंपरा महाराष्ट्रासह देशातील विद्वत्जनांना मान्य आ, ती डागाळली जाऊ नये, तिला काळिमा लागू नये, ती टिकून राहावी याचीही काळजी घेतली जाईल का? शरद जोशी या व्यक्तीवाचून तुमचे जर चालत असेल तर आनंदच आहे. पण, शरद जोशींचा चष्मा डागाळू नये असे वाटत असेल, आपण 'संघटनेचा विचार' म्हणून जे आतापर्यंत म्हणत आलो त्या विचाराची ताकद जर टिकवायची असेल तर चष्म्याचे भिंग स्वच्छच ठेवायला हवे आणि भिंग स्वच्छ ठेवायला हवे असेल तर 'कोणी म्हटले, आम्हाला मशीद पाडायची आहे, मंदिर बांधायचे आहे तरी आपले काय बिघडले?' अशा तऱ्हेने विचार करून चालायचे नाही. तुम्हाला इतपत तरी ताठ राहता आले पाहिजे आणि म्हणता आले पाहिजे, 'अमुक अमुक एक गोष्ट आम्हाला मान्य नाही; पण राजकारणातील आपद्धर्म म्हणून तात्पुरते आम्ही या बाबतीत काही बोलणार नाही.'
 तसाच, एक प्रश्न आहे राखीव जागांचा. मला राखीव जागा मान्य नाहीत - कोणाकरिताही मान्य नाहीत - दलितांकरिता मान्य नाहीत, आदिवासींकरिता मान्य नाहीत, महिलांकरिताही मान्य नाहीत. या विषयावर माझा माझ्या कार्यकर्त्यांशी मोठा वाद होण्याची शक्यता आहे. माझ्या खुल्या स्वतंत्रतावादी विचाराच्या तत्त्वामध्ये राखीव जागा ही संकल्पना बसतच नाही. याही बाबतीत ठरवता येईल, की तात्पुरती तडजोड म्हणून या प्रश्नावर सध्या काही बोलायचे नाही; पण कुणी जर असे म्हणू लागले, की जातिधर्माचा वापर करून,राखीव जागांचा वापर करून राजकारणामध्ये पुढे येणारे लोक हे शेतकरी संघटनेच्या स्वतंत्रतावादी विचाराची मांडणी करणाऱ्या संस्थापकांपेक्षा जास्त बुद्धिमान, जास्त चतुर आणि जास्त राजकारणकुशल आहेत तर त्यामुळे मला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही, हे उघड आहे.
 निवडणुकीच्या प्रचारासाठी तुम्ही मला प्रेमाने बोलावता. पण, ज्यांनी माझी पूर्वीची शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावरील भाषणे ऐकली आहेत, त्यांच्या लक्षात आले असेल, की माझी ती भाषणे आणि या निवडणूक प्रचारातील भाषणे यांत जमीनअस्मानाचे अंतर होते. मी पूर्वी काय भाषणे करत होतो आणि

पोशिंद्यांची लोकशाही / २९८