पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२९५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विरोध करणाऱ्यांच्या पंक्तीत सामील झाली असती.
 आजही माझ्यापुढे तसाच प्रश्न उभा आहे. अलीकडेच अमेरिकेच्या निवडणुका झाल्या, राष्ट्राध्यक्ष म्हणून बुश पुन्हा निवडून आले. बुश यांचा निवडणूक जाहीरनामा पाहिला तर जागतिक व्यापार संघटनेच्या पुढील वर्षी होणाऱ्या वाटाघाटींवर त्याचे परिणाम काय होणार आहेत व त्याबद्दल आपल्या देशाने काय भूमिका घेतली पाहिजे, याबद्दल शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विचारांत स्पष्टता असणे आवश्यक आहे आणि तसे सरकारला सांगायला पाहिजे. तसे न करता केवळ प्रचलित पठडीतल्या वर्तमानपत्रांतील व नियतकालिकांतील संपादकीयांवरून फटकळ मते बनवून जर काही घोषणा आपण करू लागलो तर आपले आजपर्यंत कमावलेले अर्थशास्त्रातले प्रथम स्थान टिकून राहणार नाही. ही धोक्याची सूचना मी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो.
 गेल्या विधानसभा निवडणुकीत आपद्धर्म म्हणून स्वीकारलेल्या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये मी भाषणे केली; पण, ही भाषणे करताना मला गुदमरल्यासारखे होत होते. त्याचे कारण शिवसेना वाईट आहे किंवा नाही, भाजप वाईट आहे किंवा नाही हा मुद्दा नाही; पण आपल्याला जर एखाद्या माणसाबद्दल प्रेम वाटले, तर आपण त्याच्यासाठी जीव टाकायला तयार होतो. कसलाच तर्कसंगत विचार नसलेल्या लोकांबरोबर, आपद्धर्म म्हणूनसुद्धा, काम करताना मला घृणा वाटते; त्यांच्याबरोबर राहू नये असे वाटते. खरे तर मी, अपघाताने का होईना, हिंदू घरात आणि त्यातल्या त्यात ब्राह्मण घरात जन्मलो आहे; पण मला स्वतःला, कपाळावर हेऽ एवढे गंध लावलेले आणि दाढ्या वाढवलेले लोक समोर आले, की ही आपल्यातली माणसे नाहीत, ही कोणीतरी नरमांसभक्षक टोळीतील माणसे आहेत अशी भावना होते.
 माझ्या या स्वभावामुळे काही लोक आपल्यापासून दूर राहतात का? लोकसभा निवडणुकीतील आपली भूमिका अमान्य झाल्याने शेतकरी संघटनेपासून दूर गेलेले राजू शेट्टी गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहून निवडून आले. या विजयाचे विश्लेषण करताना काहीजण म्हणाले, की तिथे शरद जोशी नव्हते हे एक कारण या विजयामागे आहे. खरेही असेल ते. कारण, शरद जोशींना शिव्या देणे हा राजकारण्यांचा खेळ आहे आणि तो खेळून निवडून येताही येत असेल, कदाचित. तेव्हा मी संघटनेला आवश्यक आहे

पोशिंद्यांची लोकशाही / २९७