पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२९७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आता निवडणुकीत मला काय भाषणे करावी लागत आहेत, याची मला त्याक्षणी लाज वाटत असे. हा सरळसरळ वैचारिक वेठबिगाराचा किंवा वैचारिक व्यभिचाराचाच प्रकार झाला. ही वेठबिगारी अशीच राहणार असेल, तर शेतकरी चळवळीला माझा जो उपयोग आहे तोच संपून जाईल. माझ्या चष्म्याची काच तडकून जाईल. त्यामुळे, 'सध्या चालवून घ्यावे' या विचारामागे राजकीय संधिसाधूपणा आहे. ज्यांच्या महत्त्वाकांक्षा राजकीय आहेत, ते आपल्याला फरफटत नेतात अशी माझी भावना होत आहे.
 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वर्ध्याला झालेल्या कार्यकारिणीचा स्पष्ट निर्णय असा होता, की लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुभवाने सन्माननीय तडजोड होत असेल, तर महाराष्ट्रातील युतीच्या बरोबर जावे, अन्यथा स्वतंत्रपणे जास्तीत जास्त जागी स्वतंत्र भारत पक्षाने उमेदवार उभे करावे; भले मग साधनांचा, निधीचा तुटवडा असो. आपण स्वतंत्र भारत पक्षाला सातच जागा सोडवून घेऊन, युती टिकवण्याची तडतोड केली ही तडजोड सन्माननीय होती का? सन्माननीय नसेल तर विकल्प शोधण्याकरिता आपण काय प्रयत्न केला? आंबेठाणला या सर्व धुमश्चक्रीत कार्यकर्त्यांची एक तातडीची बैठक विकल्प शोधण्यासाठी बोलावली. तेव्हा पन्नासेक कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याच्या विकल्पाखाली उमेदवारी करण्याची तयारी दाखवली. शेतकरी संघटनेच्या बाहेरील विसेक उमेदवारांची स्वतंत्र भारत पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची तयारी होती. थोडाफार निधी जमवण्याच्याही हालचाली सुरू होत्या. कारण, आपल्या पन्नास उमेदवार कार्यकर्त्यांपैकी बहुतेकांची आर्थिक परिस्थिती अशी आहे, की अर्ज भरताना करावा लागणारा सुरुवातीच्या खर्चाच्या किमान दहा हजार रुपयांची जमवाजमव करणेसुद्धा अवघड. इतके करूनही 'निवडून किती येणार?' हा प्रश्न निघाला आणि स्वतंत्र भारत पक्षाने स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा विचार बाजूला पडला. सात जागा घेऊन युतीबरोबर जाण्याचा जो निर्णय झाला त्यावर माझा सहीशिक्का आहे, हे मी स्पष्ट करू इच्छितो; त्याची जबाबदारी मी दुसऱ्या कोणावर टाकणार नाही. याच्यापेक्षा जास्त चांगला निर्णय घेता आला असता असेही मला वाटत नाही. पण, जे घडले ते इच्छेविरुद्ध झाले यात काही शंका नाही. मी लोकांना विचारले, की काही आपले, काही बाहेरचे असे ऐंशीनव्वद उमेदवार आपण उभे केले तर चारपाच तरी उमेदवार निवडून येतील का? मला निवडणुकीची गणिते जमत

पोशिंद्यांची लोकशाही / २९९