पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांची सरबराई करायची, त्यांनी आपल्या पक्षांच्याच घोषणा करायच्या, आपल्याच नेत्यांचाच जयजयकार करायचा; प्रसंगी दुसऱ्या मित्रपक्षांच्या नेत्यांच्या भाषणात अडथळे आणायचे, घोषणा द्यायच्या असेही उद्योग केले. तारवटलेले डोळे, गुर्मीची भाषा, बेताल चालणे आणि तोंडामध्ये वाजपेयींच्या विजयाच्या घोषणा हे काही निवडणूक मोहिमेस उपयोगी पडणारे प्रतीक नाही.
 थोडक्यात, राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे मतदारांपुढे ठेवण्यासाठी वाजपेयींच्या रूपाने उत्कृष्ट माल होता. त्याची गुणवत्ता लोकांना पटविण्यात सार्वत्रिक अपयश आले. शहरात तर सर्वदूर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सज्जड मार बसला. एका बाजूला उच्च मध्यमवर्गीयांचेच भले करणारे सरकार अशी विरोधकांची टीका सहन करायची आणि शेवटी त्याच वर्गाकडून मार खायचा, हा मोठा विरोधाभास आहे. ग्रमीण भागात काँग्रेसच्या पारंपरिक गटांना थोडाही धक्का लागलेला नाही. दक्षिण महाराष्ट्रातील सर्व जागा काँग्रेस आघाडीने जिंकल्या. प्रतिपक्षातूनच काही मोहऱ्यांना फोडून, अशा फितुरांनाच उमेदवारी देण्याचे धोरण काही उपयोगी पडले नाही. याउलट, कापूस एकाधिकाराचा अंत, वेगळ्या विदर्भाची मागणी आणि शेतकरी संघटनेच्या जिद्दीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड फळी यामुळे विदर्भ, मराठवाडा, जळगाव, सोलापूर, मालेगाव या भागांत स्वतंत्र भारत पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीस मोठे यश मिळवून दिले.
 निवडणुका संपल्या. पराभव आत्मसमीक्षेची संधी देतो. कोणत्या घटक पक्षाची काय कामगिरी आहे आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या समावेशक सहिष्णू नव्या प्रतिमेस साधक कोण आणि बाधक कोण, याचा विचार करून आतापासून मोर्चेबंदी झाली, तर महाराष्ट्रात युतीचे सरकार येऊ शकेल. पुढील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका दोनतीन वर्षांतच होऊ शकतात. त्याची तयारी करून सर्व काँग्रेसविरोधी आणि घराणेशाहीविरोधी ताकदींनी तातडीने मोर्चेबांधणी सुरू केली पाहिजे.

(२१ मे २००४)

◆◆



पोशिंद्यांची लोकशाही / २७१