पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्हावे. सोनिया गांधी, त्यांचे विदेशीपण, त्यांचे चालणे-बोलणे यांबद्दलची कुचेष्टा मर्यादा सोडून केली गेली, हे सद्भिरुचीच्या मतदारांना मानवले नाही. महाराष्ट्रातील एका मतदारसंघात एका प्रतिस्पर्धी स्त्री उमेदवाराविषयी इतकी अश्लाघ्य भाषा वापरण्यात आली, की एका जाणकार श्रोत्याने 'या एकाच भाषणामुळे बाई निवडून येणार,' असे भाकीत वर्तवले.
 ७. ग्रामीण भागात प्रचार करताना शेती आणि ग्रामीण जीवन यांच्याबद्दल काही किमान जाणकारी प्रचारकांना हवी. मराठवाड्यात आणि विदर्भात शेतकरी 'कापूस एकाधिकार' बुडाल्याबद्दल आनंद मानताहेत, ही जाणीव नसलेल्या एका नरनारायणाने 'महाराष्ट्रात युतीचे शासन आल्यास कापूस एकाधिकार योजनेचे पुनरुज्जीवन केले जाईल,' असे जाहीर करून टाकले.
 ८. गुजरातेतील दंग्यांबद्दल अडवानी आणि वाजपेयी या दोघांनीही यथायोग्य खेद व्यक्त केला; पण ते प्रकरण एवढ्यावर संपले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रत्यही नरेंद्र मोदी सरकारची लक्तरे चव्हाट्यावर येत होती. मोदींच्या अनुयायांना मात्र प्रचारासाठी त्यांना फिरविण्याची मोठी घाई होती. शेवटी, उमेदवारांनीच मोदी आणि तत्सम इतर प्रचारक आमच्याकडे न आल्यास अधिक बरे, असे सांगून भडक प्रचाराचा अतिरेक आटोक्यात आणला.
 ९. अलाहाबादचे साडीवाटप प्रकरण आणि तेथील चेंगराचेंगरीत २० हून अधिक बायांचे झालेले मृत्यू हा अपघात तर होताच; पण त्याबरोबरच वाजपेयींच्या अत्यंत निकटच्या सहकाऱ्यांच्या मनातील बेदरकारी आणि बेपर्वाई वाजपेयींच्या प्रतिमेला उजाळा देणारी नक्कीच नव्हती.
 १०. निवडणूक प्रचार ऐन भरात असताना वाजपेयींनी 'निवडणुका, राज्यकारभार इत्यादी दगदगीची आपल्याला हौस नाही,' हा मुद्दा मांडण्यासाठी स्वतःच्या निवृत्तीची आणि संभाव्य वारसदाराची गोष्ट काढली. त्यावर 'अडवाणींना उपपंतप्रधान नेमले, यातच वारसदार कोण हे स्पष्ट झाले', 'वारसदार कोण हे अजून ठरायचे आहे', 'वारसदार कोण हे गुपित मी आजच सांगणार नाही', 'या निवडणुकीत आमचा ब्रॅंड वाजपेयी आहे, पुढच्या निवडणुकीत ब्रॅंड कोणता असेल हे सांगता येत नाही' इत्यादी मुक्ताफळे उधळली गेली. सर्व प्रचाराची फळी वाजपेयींच्या शिडाच्या आधाराने गलबत हाकू पाहत असता त्या शिडालाच छेद पाडण्याचे काम निदान दुष्टबुद्धीने झाले नसावे एवढीच आशा.
 ११. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील काही घटक पक्षांनी योजनापूर्वक एक रणनीती आखली. रालोआच्या प्रचारसभांना आपली माणसे वाहून न्यायची,

पोशिंद्यांची लोकशाही / २७०