पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पटेल आणि त्यांच्यामधून तुम्हाला पाठिंबा देणारा कार्यकर्ता आणि सैनिक मिळेल.
 स्वतंत्र भारत पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या बाजूने काय काय विचार झाला, तो पहा.
 ५० वर्षे काँग्रेसने शेतकऱ्यांना बनवलं, त्यांनी शेतकऱ्यांना उत्पादनखर्चाइतकासुद्धा भाव मिळू नये, असं धोरण ठरवून राबवलं.गेल्या २५ वर्षांत मी या विषयावर लेख लिहिले, पुस्तकं लिहिली, भाषणं केली, कागदोपत्री पुरावा दाखवून दिला. प्रणव मुखर्जी काँग्रेसचे व्यापारमंत्री असताना त्यांनी जागतिक व्यापार संस्थेला जो अहवाल दिला, त्यातील आकडेवारीचा अर्थ थोडक्यात असा आहे : जपानमध्ये शेतकऱ्याचा उत्पादनखर्च १०० रुपये असेल, तर त्याला १९० रुपये मिळाले पाहिजेत असं सरकारी धोरण आहे आणि हिंदुस्थानातल्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्याचा उत्पादनखर्च १८७ रुपये असला, तर त्याला १०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळता कामा नये. हे व्यापारमंत्र्यांनी जागतिक व्यापार संस्थेकडे लेखी दिलं आहे. निवडणूक प्रचारातच नव्हे, तर इतर वेळीही कोणत्याही पक्षानं, अगदी विरोधी पक्षानंसुद्धा हा अन्याय पुढे मांडला नाही. ते फक्त माणसाचं चित्र काढताना नाकातले केसच ठळक करत बसले.५० वर्षे काँग्रेसनं अशा तऱ्हेनं शेतकऱ्यांना बुडवलं, हा मुद्दा अभ्यासपूर्वक कोणी मांडत नाही. याबद्दल काँग्रेस आजसुद्धा माफी मागत नाही; आपलं चुकलं असं म्हणत नाही. लोकसभा निवडणुका २००४ चा त्यांचा जो जाहीरनामा आहे, त्यात त्यांनी उलट त्या धोरणाचं समर्थन केलं आहे - १९५० मध्ये आमचं जे धोरण होतं, ते बरोबरच होतं, १९६० मध्ये आमचं जे धोरण होतं, ते बरोबरच होतं - थोडे शब्द बदलले. शेतकरी संघटनेने म्हटलं, की शेतकऱ्याच्या शेतीमालाला रास्त भाव मिळू नये अशी धोरणं काँग्रेसने आखली. त्यांचा जाहीरनामा म्हणतो, की समाजवादी कारखानदारीला भांडवल मिळविण्याकरिता जी धोरणं आखण्यात आली, ती बरोबर होती; म्हणजे शेतीला लुटण्याची धोरणं बरोबर होती. ५० वर्षे शेतकऱ्याला गरिबीत ठेवणारं, ५० वर्षे शेतकऱ्याला कर्जात बुडवणारं, ५० वर्षे शेतकऱ्यांना आत्महत्येच्या मार्गाकडे ढकलणारं आणि 'आपण कर्जात जन्मलो, कर्जात जगलो आणि कर्ज डोक्यावर घेऊन मेलो,' असं हळहळत शेतकऱ्यांना जीवन कंठायला लावणाऱ्या काँग्रेस पक्षाने त्याबद्दल एका शब्दानेसुद्धा कधी दिलगिरी व्यक्त केली नाही.
 उलटपक्षी, मला राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जे काही आकर्षक वाटतं,

पोशिंद्यांची लोकशाही / २५२