पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असतो, ते समजावण्यासाठी एक उदाहरण सांगतो. शाळेतल्या एका वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, की माणसाचं चित्र काढा. सगळी मुलं चित्र काढायला लागली. शिक्षक फिरून मुलं कशी चित्र काढतात, ते बघायला लागले. एका मुलाजवळ थांबून पाहू लागले, तर तो नुसत्याच छोट्या छोट्या रेघा काढीत होता. शिक्षक म्हणाले, 'अरे, मी तुम्हाला माणसाचं चित्र काढायला सांगितलं, तर तू या नुसत्या रेघा रेघा काय काढतोस?' मुलगा म्हणाला, 'मी त्या माणसाच्या नाकातले केस काढतो आहे पहिल्यांदा. मग बाकी चित्र काढीन.' तसंच, निवडणूक दिल्लीच्या लोकसभेची, तिथले प्रश्न, मुद्दे काय आहेत ते सोडून, स्थानिक पातळीवरच्याच प्रश्नांवर - ते कितीही महत्त्वाचे असले तरी - रण माजवत राहणे म्हणजे माणसाचं चित्र काढणाऱ्या मुलानं नाकातले केस काढण्याला महत्त्व दिल्यासारखं होईल. म्हणजे, आपल्याला सोईस्कर असेच मुद्दे घेऊन विरोधी उमेदवारावर, पक्षावर हल्ला केला, तर भाषणं खूप आकर्षक होतील - ऐतिहासिक नाटकातल्या 'कंसात तलवार उपसून' संवादाच्या धर्तीची; करमणूक चांगली होते, त्यामुळे काही मतदार वक्त्याच्या बाजूला वळतीलही. हल्ली तेही सांगता येत नाही, म्हणा. हल्ली लोकही खूप शहाणे झाले आहेत. तेही म्हणू लागलेत, की ज्या अर्थी याने आवाज चढवला, त्या अर्थी हा मनुष्य खरं बोलत नसावा. मला अशा प्रकारचा युक्तिवाद करायचा नाही.
 २१ व्या शतकातील ही पहिली निवडणूक आहे. समाजवादी रशियाचा पाडाव झाला आहे. समाजवादाने, नियोजनाने आणि लायसन्स-परमिट-कोटा व्यवस्थेने कोणत्याही देशाचा विकास होत नाही, हे सिद्ध झाले. त्यानंतरच्या काळातली ही पहिली निवडणूक आहे. जैविक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, जनुक तंत्रज्ञान अशी आधुनिक तंत्रज्ञानं सर्वदूर पसरल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे. ११ सप्टेंबर २००२ ला आतंकवाद्यांनी न्यूयॉर्क शहरावर हल्ला केल्यानंतर आतंकवाद हा जागतिक धोका आहे, याची जाणीव तयार झाल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. त्या दृष्टीने २१ व्या शतकातील ही पहिली निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.
 कोणाला पर्यायी जमीन मिळाली किंवा नाही, धरण झालं का नाही झालं, कोणाला पाणी मिळालं, कोणाला नाही मिळालं... अशी स्थानिक पातळीवरची सगळी दु:खं खरी आहेत. पण, तरी लोकसभेच्या निवडणुकातील मतदारांसमोर देशाचं चित्र मांडताना, ते फार जबाबदारीनं, केवळ लोकांच्या भावनांना आवाहन न करता, संपूर्ण मांडलं पाहिजे. तसं केलं, तरच समोरच्या श्रोत्यांची खात्री

पोशिंद्यांची लोकशाही / २५१