पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 रालोआचे उमेदवार आपल्या प्रचाराच्या भाषणात आग्रहाने मांडतात, की काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यांची लूट झाली. काँग्रेसने शेतकऱ्यांना बरबाद केले.
 खरे आहे. काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यांची लूट झालीच. १९८० सालापासून मी त्याच्याबद्दल लिहितो आहे, बोलतो आहे, आंदोलन करतो आहे, अनेक सहकाऱ्यांसह लाठ्या खातो आहे, तुरुंगात जातो आहे. माझे अनेक कार्यकर्ते गोळीबारालासुद्धा बळी पडले आहेत. हे आंदोलन काँग्रेसच्या निर्णयांविरुद्ध झालं, तसंच भाजप-शिवसेना युती सरकारच्या वेळीही झालं. सत्य परिस्थिती लपवून ठेवण्याचे काही कारण नाही. युती सरकारच्या काळात अमरावती जिल्ह्यात कापसाची कैफियत मांडताना ३ शेतकरी बळी पडलेले आहेत. दोघांची शेतीविषयक धोरणं जर प्रत्यक्षात तपासली, तर एकाला फार वर चढवावं आणि दुसऱ्याला नीच लेखावं असं डावं-उजवं करण्यासारखं नाही. माझ्या निर्णयाचं समर्थन करण्याकरिता जर मी असं डावं-उजवं करणारं, बोलू लागलो तर ज्या शेतकऱ्यांशी इमान राखून गेली २५ वर्षे मी काम केलं, त्यांच्याशी प्रतारणा केल्यासारखे होईल. ते करण्याचा माझा विचार नाही. तरीदेखील, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा द्यायचा निर्णय मी का घेतला? :
 पहिला मुद्दा : शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना अमुक अमुक द्या असं कधी मागितलं नाही. आम्हाला तुमच्या सबसिड्या नकोत, आम्हाला तुमच्या योजना नकोत, प्रकल्प नकोत; जेव्हा जेव्हा सरकार काही प्रकल्प किंवा योजना पुढे ठेवून, कोणत्या ना कोणत्या मार्गाने शेतकऱ्याला काहीतरी देण्याचं नाटक करतं तेव्हा त्यातील जवळजवळ ९०% निधी नोकरदार आणि व्यवस्था खाऊन जाते, शेतकऱ्यांपर्यंत काहीही पोहोचत नाही. मुळामध्ये, सरकार देशाच्या काय किंवा शेतकऱ्यांच्या काय,समस्या सोडवतं याच्यावर आमचा विश्वास नाही.शेतकरी संघटनेच्या ज्या प्रख्यात घोषणा आहेत, त्यांपैकी एक आहे, 'सरकार समस्या क्या सुलझाये, सरकार यही समस्या है।' तेव्हा, काँग्रेसच्या सरकारने काय आणि रालोआच्या सरकारने काय केले हा वाद महत्त्वाचा नाही. आज मुंबईला काँग्रेस आघाडीचं सरकार आहे. त्याच्या आधी युतीचं सरकार होतं आणि त्याच्या आधी काँग्रेसचं. दिल्लीत आता रालोआचं सरकार आहे आणि त्याच्या आधी काँग्रेसचं. या सर्व काळात शेतकऱ्यांची परिस्थिती सारखीच होती. निवडणुकीच्या काळात प्रचाराच्या सभांत दुसऱ्याची उणी काढायची आणि आपली उणी लपवायची हा मुख्यतः उद्योग असतो. हा प्रकार किती वाह्यात

पोशिंद्यांची लोकशाही / २५०