पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठेवून आहे. एवढेच नव्हे तर, इतर गरीबगुरीब राष्ट्रांना वेगवेगळ्या प्रकारांनी मदत करतो आहे. एकेकाळचा, मदतीची याचना करणारा देश आता मदत देणारा झाला आहे. याचाही तसा या नव्या आत्मविश्वासाच्या अनुभवाशी काही संबंध नाही.
 भारतीय गणकशास्त्रज्ञ जगभर नाव कमावून आहेत. अमेरिकन कंपन्यांकरिता गणकशास्त्रीय आधार भारतातील कंपन्या देतात. अमेरिकेतील भारतीय आता तेथे सन्मान्य आणि समृद्ध नागरिक समजले जातात, हेही खरे; पण याचाही संबंध या नव्या आत्मविश्वासाच्या जाणिवेशी तसा नाही.
 गेली कित्येक वर्षे आतंकवादी देशाच्या कानाकोपऱ्यात आणि मर्मस्थानातसुद्धा धुमाकूळ घालत आहेत. त्यातही काही फारसा फरक पडला आहे असे नाही. १९६५ आणि १९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर मात करूनही आम भारतीयांच्या मनात पाकिस्तानसारखे भारताच्या एक पंचमांश आकाराचे राष्ट्र तुल्यबळ वाटत असे. आता आतंकवाद्यांच्या कारवायांकडे भारतवासी अधिक आत्मविश्वासाने पाहतात.
 अनिवासी भारतीयांना हा एक नवा सुखद अनुभव आहे. वर्षानुवर्षे विदेशांत भारतीय व पाकिस्तानी यांना एकसारखेच मानून दोघांचीही अवहेलना होत असे. आता, भारतीयांना विशेष सन्मानाने आणि प्रतिष्ठेने वागवले जाते, एक प्रज्ञावंत जमात म्हणून त्यांचा आदर होतो.
 या नव्या आत्मविश्वासाचा प्रत्यय अलीकडील क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यांत आला. आंतरराष्ट्रीय सामन्यांत मर्दुमकी गाजवणारा भारत पाकिस्तानसमोर खेळताना न्यूनगंडाने पछाडला जाई आणि मोक्यावर कच खाई. आता भारतीय संघाच्या मनात असा काही न्यूनगंड नाही. पूर्वी शेवटच्या फेकीवर षट्कार मारून पाकिस्तान संघ जिंके, आता भारतीय संघही शेवटच्या क्षणापर्यंत कसोशीची लढत देऊ शकतो आणि सरशीही मिळवतो.
 आंतरराष्ट्रीय खेळांच्या सामन्यांत भारतास क्वचितच कांस्यपदके मिळत. अलीकडे अनेक भारतीय खेळाडू रौप्य आणि सुवर्णपदकेही मिळवतात. या क्षेत्रात भारत काही अग्रणी देश झाला असे नाही; पण अगदीच धूळ खाणारा देशही राहिलेला नाही.
 वर्षानुवर्षे आंतरराष्ट्रीय आकडेवारीत दरडोई उत्पन्न, शिक्षणाचा प्रसार, आरोग्य आणि वैद्यकीय सेवा अशा विकासाच्या सर्व मापदंडासंबंधीच्या आकडेवारीत भारताची गणना शेवटच्या पाचदहा देशांत असे. आता क्रमांक काहीसा सुधारला

पोशिंद्यांची लोकशाही / २४१