पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अविश्वसनीय किंवा एकांगी आकडे फिरून फिरून मांडण्यात आले. अन्नधान्याची मुबलकता, टेलिफोन सेवांची वाढती कार्यक्षमता, राष्ट्रीय रस्ते बांधणीचा कार्यक्रम इत्यादींची गणना झाली. विरोधकांनी Shining चा उपहास केला; गरिबी, भूकबळी, बेरोजगारी कसे अव्याहत चालू आहेत हे एकतर्फी आकडेवारीतून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मतदारांनी 'भारत उदय'च्या आकडेवारीच्या जाळ्यात सापडू नये; तसेच Feel Bad वाल्यांच्याही प्रचाराकडे डोळसपणे पहावे.
 कोणी म्हणेल गरिबी कमी झाली, कोणी म्हणेल गरिबी वाढली; कोणी म्हणेल लक्षावधी रोजगार वाढले, कोणी आकडेवारीने सिद्ध करील, की बेकारी वाढली. एक सांगेल भारतीय मालाची निर्यात वाढली, विरोधी सांगतील परदेशी स्पर्धेपुढे टिकाव न लागल्यामुळे कारखाने भराभर बंद पडत आहेत. सर्वसाधारण नागरिकाकडे ही आकडेवारी तपासण्याची काही साधने नसतात किंवा समजून घेण्यासाठी लागणारे पांडित्यही नसते. सर्वसाधारण मतदार बहुतेक दिवशी नेहमीचे वर्तमानपत्र वाचतो; काही तुरळक साप्ताहिके चाळतो. अलीकडे अलीकडे टेलिव्हिजनवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्या पाहतो आणि ऐकतो. दूरदर्शनची मक्तेदारी संपुष्टात आल्यामुळे सरकार आणि सत्ताधारी पक्ष यांच्या विरुद्धच्या बातम्या व टीकाटिप्पण्या घरोघर टेलिव्हिजनच्या मार्गाने पोचतात. सर्वसामान्य मतदाराची प्रतिक्रिया अशी, की फारसे काही बदललेले नाही; पण तरीही कोणत्या का कारणाने होईना, देशभर एक नवा आत्मविश्वास अनुभवाला येत आहे.
 आत्मविश्वासाची नाळ?

 अन्नधान्याचा तुटवडा संपला आहे. डझनभर देशांना भारत आता अन्नधान्याची निर्यात करतो. दुधाचे दुर्भिक्ष्य संपले आहे. दुग्धजन्य पदार्थ ग्रहकांना विकण्यासाठी उत्पादकांची चढाओढ चालली आहे. या मुबलकतेचा आणि या नव्या आत्मविश्वासाचा तसा काही संबंध नाही.
 स्वातंत्र्यानंतरच्या समाजवादाच्या काळात परदेशी चलन म्हणजे मोठी दुर्मिळ वस्तू होती. अगदी आवश्यकता असलेल्या लोकांनासुद्धा डॉलरपौंड मिळणे मोठे कठीण होते. आज, रुपया जवळजवळ पूर्णपणे परिवर्तनीय झाला आहे. म्हणजे रुपयाच्या बदली परकीय चलन विनिमयाच्या दराने कोणालाही मिळवता येते. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत घसरत जात होता. एका रुपयाची किंमत दोन अमेरिकन सेंट इतकी खाली घसरली होती. आता रुपयाची किंमत वाढत आहे आणि डॉलर घसरत आहे. १५ वर्षांपूर्वी देशातील सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची पाळी आलेला हा देश आजघडीला अब्जावधी डॉलर्सची गंगाजळी

पोशिंद्यांची लोकशाही / २४०