पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. पण, त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ही सुधारणा तात्पुरती नाही, स्थायी आहे.
 नियोजनाच्या सर्व काळात भारताच्या राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीची गती ३ टक्क्यांच्या आसपास राहिली. या गतीला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ 'विकासाची हिंदू गती' (Hindu rate of growth) म्हणत. लोकसंख्येची वाढ लक्षात घेता दरडोई उत्पन्नाच्या वाढीची 'हिंदू गती' फक्त दीड टक्क्याची होती. २००३-०४ सालच्या शेवटच्या तिमाहीत राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीची गती १०.४ टक्के होती. मरगळून टुकूटुकू खेळणाऱ्या फलंदाजाने एकाएकी षट्कारचौकारांची आतषबाजी सुरू करावी असा हा प्रकार आहे. नियोजनाच्या पूर्ण काळात देश दारिद्र्याच्या दुष्टचक्रात अडकल्यासारखा झाला होता. आता, तो नव्या उड्डाणास तयार झाला आहे. विकासाच्या गतीतील ही वाढ अस्थायी नाही. स्वातंत्र्याच्या काळापासून चीन विकासाच्या बाबतीत भारताच्या पुढे राहिला; साम्यवादी चीन समाजवादी भारताच्या पुढे राहिला. साम्यवाद्यांनी चीनची कौतुके गाईली. खुल्या व्यवस्थेचा चीनही भारताच्या तुलनेत अधिक गतीने विकास करू लागला. 'चिनी लोक फार कष्टाळू आहेत, त्यांची आपली तुलना कशी व्हायची?' असा एक न्यूनगंड भारतीयांच्या मनात मूळ धरू लागला होता. या तिमाहीत भारताने विकासाच्या गतीत चीनवरही मात केली. एवढेच नव्हे तर यापुढेही हे उड्डाण चालू राहील आणि भारत नजीकच्या भविष्यकाळात जागतिक महासत्ता बनेल, असा विश्वास निदान धडाडीच्या, कर्तबगार व गुणवंत उद्योजकांत तयार झाला आहे. भारत ही एक नवीन आर्थिक ताकद जगात उभी राहत आहे याची जाणीव जगभर झाली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ५५ वर्षांत देश घसरणीला लागला. येत्या वीस वर्षात तो एक सामर्थ्यवान महासत्ता बनेल, याबद्दल जगभरच्या देशांत कौतुक आहे आणि भारतीय उद्योजकांच्या मनात आत्मविश्वास.
 शेतकऱ्यांत आशांची पहाट
 ही नवी 'फील गुड'ची भावना समप्रमाणात शेतकरी वर्गात पोहोचलेली नाही हे 'भारत उदय' यात्रेला निघण्यापूर्वी स्वतः उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी मान्य केले आहे. आजही काही राज्यांत जुन्या साठलेल्या कर्जापोटी शेतकरी आत्महत्येचा टोकाचा मार्ग अनुसरीत आहेत. पण, तरीही काळोखी मध्यरात्र संपत आली आहे आणि दिशा फुटू लागली आहे असा एक आशावाद शेतकऱ्यांत तयार होतो आहे. सरकार फारशी मदत करीत नसेल, काहीवेळा मोठ्या चुकाही करीत असेल हे खरे; परंतु दशकानुदशके शेतकऱ्यांना उत्पादनखर्चाइतकाही भाव मिळू न देणाऱ्या काँग्रेसी शासनाच्या काळचा

पोशिंद्यांची लोकशाही / २४२