पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रयोगानंतरसुद्धा आपण वाचलो आहोत; कारण इथं समाजवाद आला नाही, समाजवादाची बेगडी नक्कल आली. या परिस्थितीची जाणीव होताच, त्यातून बाहेर पडण्यासाठी लोकांची धडपड सुरू झाली.
 महात्मा गांधींनी पहिल्यांदा स्वातंत्र्याची व्याख्या दिली. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय लोक निघून जाणे नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे आपल्या भवितव्याला आकार देण्याची मुभा मिळणे होय. नेहरूंनी उलटी उडी मारून, नवी गुलामगिरी लादली, गांधीजींच्या विचाराचा उच्छेद करून टाकला आणि तरीदेखील हुशारी अशी, की सगळ्या देशभर चर्चा करताना 'गांधी-नेहरू' हा द्वंद्व समास वापरला. हा समास देवदानव या समासासारखा आहे. याला विरोध करण्याची हिंमत कोणाला झाली नाही. गांधीजींचे उत्तमोत्तम शिष्य नेहरूंच्या मागे शेपट्या हलवीत हलवीत जाऊ लागले. कोणला मंत्रिपदाची आशा, कोणाला गव्हर्नरपदाची आशा, कोणाला कशाकशाची आशा! अगदी गांधीवादाची जोपासना करण्याचा वसा घेतलेले त्यांचे बहुतेक पट्टशिष्यसुद्धा आश्रमाला चांगल्यापैकी काही एकर जागा मिळावी म्हणून नेहरूंचे स्तुतिपाठक भाट झाले आणि अशा या परिस्थितीमध्ये नेहरूंनी चालवलेल्या या समाजवादाविरुद्ध स्पष्टपणे भाषा वापरणारा एक महान वीर पुढे आला. त्याचं नाव चक्रवर्ती राजगोपालाचारी.
 समाजवादाचा पुरस्कार हिंदुस्थानातील अनेक मान्यवर करीत होते. नरेंद्र देव, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, लोहिया यांच्यासारख्या थोर नेत्यांची समाजवादाला मान्यता होती; पण त्यांचा हा भारतीय समाजवाद आणि नेहरूंचा समाजवाद यांत फरक होता. विषय गहन असला, तरी थोडक्यात स्पष्ट करतो. भारतातला समाजवाद हा सानेगुरुजींच्या भाषेत, 'कसणाऱ्याची धरणी आणि श्रमणाऱ्याची गिरणी' या अर्थाचा होता. नेहरूंचा समाजवाद म्हणजे 'कसणाऱ्याची धरणी' नाही आणि 'श्रमणाऱ्याची गिरणी' नाही; तर 'धरणी आणि गिरणी दोन्ही सरकारचे, सरकार सगळे नेहरू घराण्याच्या वारसांचे,' या अर्थाचा. याला चक्रवर्ती राजगोपालाचारींनी 'लायसन्स-परमिट-इन्स्पेक्टर राज' असा शब्द वापरला. ज्या वेळी सगळ्या जगामध्ये समाजवादाचा बोलबाला होता, त्या वेळी राजगोपालाचारींनी नेहरूंच्या या समाजवादी नियोजनाचा अर्थ अचूकपणे सांगितला, "ही केवळ हुकूमशाही आणण्याची भारतीय पद्धत आहे. यातून पुढे नंतर घराणेशाहीही येणार आहे. नेहरूंच्या मनामध्ये प्रतिअशोक बनण्याची इच्छा आहे आणि आपल्या घराण्याची हुकूमशाही देशात निर्माण करायची

पोशिंद्यांची लोकशाही / २२३