पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. त्यासाठी 'लायसन्स-परमिट-इन्स्पेक्टर राज' ही पहिली पायरी आहे."
 नेहरूंच्या या प्रयत्नांना रोखण्यासाठी राजगोपालाचारींनी 'स्वतंत्र पक्ष' निर्माण केला. पहिल्या निवडणुकीतच 'स्वतंत्र पक्ष' लोकसभेतील सर्वांत मोठा विरोधी पक्ष बनला. स्वतंत्रतेचा झेंडा घेतलेले लोक सहजी मागे राहत नाहीत, त्यांनी स्वतंत्र पक्षामागे आपले बळ लावले. गुजरात राज्यात तर स्वतंत्र पक्षाच्या हाती सत्ता आली. म्हणजे स्वातंत्र्याचा संदेश लोकांपर्यंत नीट पोहोचला, तर असं परिवर्तन होऊ शकतं; पण नेहरू घराण्याची मंडळी मोठी भामटी. अजूनही तशीच आहेत. स्वतंत्र पक्षाच्या पहिल्याच झटक्याने ते सावध झाले. त्यांनी सबंध हिंदुस्थानात प्रचार सुरू केला, की 'स्वतंत्र पक्ष' हा संस्थानिकांचा, राजेरजवाड्यांचा, भांडवलदारांचा, 'टाटा-बिर्लां'चा पक्ष आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटून, समाजवादाच्या प्रभावाखाली आलेल्या समाजात त्या काळी हे शब्द म्हणजे शिव्या होत्या. अगदी भारतीय समाजवाद्यांच्या दृष्टीनेही. जमीनदार, भांडवलदार, उद्योजक, कारखानदार हे शब्द शिवीसारखे वापरले जात. कोणत्यातरी सरकारी नोकरीत असणे, कोणत्यातरी सरकारी कॉर्पोरेशनमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर असणे - मग तो धंदा बुडवत का असेना - हे गुणवर्णनाचे मापदंड झाले होते; त्यांना देशभक्त मानले जायचे. नेहरूंच्या या शब्दांच्या खेळांनी भारतीय लोक फसले आणि राजगोपालाचारींच्या स्वतंत्र पक्षाचा स्वातंत्र्याचा प्रयोग फसला. केवढी मोठमोठी माणसं त्यांच्याबरोबर होती! स्वतः महात्मा गांधींनी पंतप्रधानपदाकरिता नेहरूंच्या बरोबरीने ज्यांचं नाव घेतलं होतं आणि संपूर्ण जगामध्ये स्वातंत्र्याच्या विचारसरणीवरील अधिकारी माणूस म्हणून ज्यांना मान्यता होती, ते मिनू मसानी राजगोपालाचारीचे सर्वांत निकटचे सहकारी होते. असे असतानासुद्धा नेहरूवाद्यांनी केलेल्या राजकारणातल्या खेळामुळे आणि 'गरिबी हटाव'सारख्या भ्रामक घोषणा देऊन मतदारांना भुलवल्यामुळे स्वतंत्र पक्षाचा प्रयोग अयशस्वी झाला.
 त्यानंतर स्वातंत्र्याचा झेंडा उभारण्याचं काम कोणी राजेरजवाड्यांनी केलं नाही, कोणीही कारखानदारांनी केलं नाही. १९८० मध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटना नावाची एक लहानशी संघटना चाकणच्या कांदेबाजारात उभी राहिली. त्यात शेपाचशे शेतकऱ्यांसमोर मी उभं राहून म्हटलं, की आपला हेतू आहे, की शेतकऱ्याला सुखानं आणि सन्मानानं जगता यायला पाहिजे, तसं जगता यायला पाहिजे असेल, तर त्याला मार्ग एकच आणि तो म्हणजे शेतीमालाचा भाव जाणूनबुजून बुडविण्याचं जे कारस्थान सरकारनं रचलं आहे, ते मोडून 'शेतीमालाला

पोशिंद्यांची लोकशाही / २२४