पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुरुवात करावी कोठून? याचा विचार करून, मी असं ठरवलं, की पहिल्यांदा हिंदुस्थानातील इंग्रज सरकार नष्ट करू आणि त्यानंतर सगळ्या जगातील सरकारं आणि शासनसंस्था ही व्यवस्था खलास करायला लागेल...' आणि त्यांच्या शिष्योत्तमांनी काय भूमिका घेतली? त्यांनी म्हटलं, की सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक क्षेत्र, सरकारी नियोजन मंडळ (झश्रळिसि गीळीळी), पंचवार्षिक योजना, वेगवेगळी सरकारी खाती यांच्या हाती सत्ता राहावी. म्हणजे एका अर्थी गांधीजींचा खराखुरा 'हत्यारा' हिंदुस्थानच्या पंतप्रधानपदी बसला. तेव्हापासून हिंदुस्थानात गुलामगिरीचा एक नवा कालखंड सुरू झाला. स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात गोऱ्या इंग्रजांची गुलामगिरी होती, स्वातंत्र्यानंतर काळ्या इंग्रजांची गुलामगिरी आली.
 नेहरू त्या वेळी नुकतेच समाजवादी रशियात जाऊन आले होते. शहरांतील वैभव पाहून, एखादा खेड्यातील पोरगा जसा चकित होऊन जातो तसंरशियातील चकचकाट पाहून, नेहरूंना कुतूहलमिश्रित आश्चर्य वाटलं आणि त्या प्रभावाने 'जगामध्ये समाजवादी रशियासारखा महत्त्वाचा प्रयोग कोणताही नाही,' असं त्यांनी जॉर्ज बर्नाड शॉ आणि बर्ट्र्र्ंड रसेल यांच्यासमोर प्रत्यक्षात मांडलं. हिंदुस्थानात त्यांनी सार्वजनिक चर्चा घडवून आणली नाही, समाजवादाच्या प्रश्नावर कधी निवडणूक लढवली नाही, 'समाजवाद आणि समाजवादी धाटणीची समाजरचना हे हिंदुस्थानचं ध्येय आहे,' असं त्यांनी एकदम जाहीर करून टाकलं. गांधीजींचा शिष्योत्तम, प्रभावी व्यक्तिमत्व, उच्च राहणीमान; यामुळे लोकांचं त्यांच्यावर इतकं अपार प्रेम होतं, की त्यापोटी सबंध देशानं समाजवादाचं हलाहलसुद्धा पचवण्याची तयारी दाखवली. हलाहल गिळणारा एक शंकर होऊन गेला, त्याचा फक्त कंठ निळा झाला. हिंदुस्थानला हे समाजवादाचं विष पचलं नाही. समाजवादी रशियाने प्रामाणिकपणे समाजवादाचा प्रयोग केला आणि तो देश शकलं शकलं होऊन मरून गेला. हिंदुस्थान समाजवादाचा प्रयोग काही प्रमाणात करूनसुद्धा संपूर्ण नष्ट झाला नाही, अजून जिवंत आहे, पुन्हा एकदा जागृत होण्याची धडपड करतो आहे. यामागे कारण आहे, हिंदुस्थानात कधी शुद्ध माल काही येत नाही, जो येतो तो भेसळच माल येतो. आपण नेहमी वाचतो, की एखादा शेतकरी कंटाळून जीव द्यायला निघतो आणि एन्ड्रिन पितो; पण ते भेसळीचे, बनावट निघाल्याने त्याला त्रास होतो, तरी तो मरत नाही. रशियाने शुद्ध समाजवादाचा प्रयोग केला आणि तो मेला. आपल्या देशाची अवस्था एन्ड्रिन पिणाऱ्या त्या शेतकऱ्यासारखी झाली. समाजवादाच्या

पोशिंद्यांची लोकशाही / २२२