पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१९८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मी स्वातंत्र्याचा सैनिक म्हणून हिंदुस्थानात आलो. शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घ्यायच्या आधी शेतकरी बनून, शेतीचा आणि शेतीच्या अर्थकारणाचा अभ्यास केला आणि सगळ्यांत जास्त अन्याय कोणत्या बहुसंख्यांवर होत असेल, तर ते शेतकरी आहेत, असे माझ्या लक्षात आले आणि मी या बहुसंख्याक अन्यायग्रस्तांच्या शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यापासून सुरुवात केली. शेतकरी आंदोलन उभं राहिलं, शेतकरी आंदोलन फोफावलं हे खरं आहे. लोकांनी मला खूप मानलं आणि निवडणुकीत लोकांनी मला खूप पाडलंही. त्याचा राग कोणावर काढायचा? मनुष्याच्या मृत्यूनंतर पापपुण्याचा पाढा वाचण्याबद्दल वेगवेगळ्या धर्मांत वेगवेगळ्या कल्पना आहेत. मुसलमान धर्मात कयामतची कल्पना आहे. त्या दिवशी अल्लासमोर मृताच्या आत्म्याने आपला हिशेब द्यायचा असतो. हिंदू धर्माच्या कल्पनेप्रमाणे माणसाच्या पापपुण्याची दैनंदिन नोंद चित्रगुप्ताने आधीच ठेवलेली असते. त्यामुळे मरताक्षणीच त्याचा हिशेब करून, त्याची स्वर्गात किंवा नरकात रवानगी केली जाते. मला जर का कयामतची संधी मिळाली तर मी काय जबाब देईन? मी म्हणेन, 'माझ्या मनात जे काही मी करायला पाहिजे असे होते, ते मी माझ्या शक्तीनुसार केलं. लोकांनी मला फळ दिलं नाही, तरी माझी खात्री आहे, की अल्ला माझ्यावर रागावणार नाही.' त्यावर अल्ला म्हणेल, 'तुझ्या मनात जेवढं होतं, तेवढं केलंस ना? शाब्बास!'
 माझी खात्री आहे, की अंतिम विजय स्वातंत्र्याचाच होणार आहे आणि म्हणून मी हा सगळा प्रयत्न चालवला आहे. यामध्ये माझी एक व्यावहारिक गरज आहे.
 जगात एक फार मोठं युद्ध चालू आहे. या युद्धात तोफा नाहीत, सैन्य नाही, आक्रमण नाही; यात आगी लागत नाहीत, अत्याचारही होत नाही, खूनखराबा होत नाही. या युद्धात एका बाजूला माझ्यासारखे 'स्वातंत्र्य हवे' म्हणणारे लोक तर दुसऱ्या बाजूला 'स्वातंत्र्य नको, कोणीतरी मध्यस्थ हवा' म्हणणारे लोक आहेत. माझा ईश्वर-अल्ला आणि मी यांच्यामधील संबंधात मध्यस्थ कोणी नाही असे म्हणणारे सगळे माझ्यासारखे स्वातंत्र्यवादी एका बाजूला आहेत आणि 'मधे सरकार पाहिजे,' आणखी कोणत्या संस्था हव्यात, संघटना हव्यात, कोणीतरी प्रमुख पाहिजे, असे म्हणत मेंढपाळ होऊ पाहणारे कळपवादी दुसऱ्या बाजूला. अशा स्वातंत्र्यवाद्यांचं आणि कळपवाद्यांचं मोठं युद्ध जगभर चालू आहे. १९८० मध्ये शेतकरी संघटना उभी करून शेतकऱ्यांच्या सैन्याच्या साहाय्याने मी हे युद्ध सुरू केलं. १९९१ मध्ये डॉ. मनमोहन सिंगांनी खुल्या व्यवस्थेकडे

पोशिंद्यांची लोकशाही / २००