पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१९७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझ्या वाडवडिलांची एक इंच जमीन नसताना, माझ्या मागील पाच पिढ्यांमध्ये कोणीही शेतकरी नसताना मी शेतकरी झालो आणि शेतकरी संघटनेचं काम चालू केलं; कारण मी स्वातंत्र्याचा सैनिक आहे. माझ्या मनाप्रमाणे, माझ्या स्वभावाप्रमाणे, माझ्या प्रकृतीप्रमाणे मला प्रयोग करण्याची संधी पाहिजे.
 मी ईश्वर मानतो का? हो, मी ईश्वर मानतो. पण, मी ईश्वर खासगीचा मानतो. मी माझ्या ईश्वराची साधना माझ्या घरामध्ये करतो. हे माझं खासगी प्रकरण आहे. जसं, वयात आलेल्या दोन व्यक्तींनी एकमेकांत कसा व्यवहार करावा यासंबंधी त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे, त्यावर दुसऱ्या कोणाचंही बंधन असता कामा नये. माझं आणि ईश्वराचं नातं प्रेमिकाचं आहे, खासगीचं आहे. मी त्याला इतका जवळचा समजतो, की माझ्या त्याची पूजा करण्याच्या किंवा आराधना करण्याच्या माझ्या हक्काच्या आड कोणी आलेलं मला खपणार नाही.
 मूर्तिपूजा उचित का अनुचित असाही एक धर्माधर्मांत वाद निर्माण करणारा विषय. ज्याला मूर्तिपूजा सार्थ वाटत असेल, त्याचा त्याच्या खासगी आयुष्यात ती करण्याचा हक्क डावलता येणार नाही. ज्याला ती निरर्थक वाटेल, त्याच्यावर ती करणे लादता येणार नाही. मी सध्या माझ्या घरात मूर्तिपूजेचा एक प्रयोग करीत आहे. या प्रयोगातून मला अशी खात्री वाटू लागली आहे, की आपण निर्जीव मूर्तिमध्येही देवपण घालू शकतो. अर्थात हा माझ्या खासगी प्रयोगाचा निष्कर्ष आहे, तो मी कोणावर आग्रहाने लादणार नाही.
 तर, अशी माझी धर्मासंबंधी व्यापक कल्पना आहे. अनेक धर्म पाहिजेत, तसेच असणे साहजिक आहे. संस्कृतमध्ये 'धारयति इति धर्मः' अशी धर्माची व्याख्या केली आहे. म्हणजे ज्याच्यामुळे जीव जगवता येतो तो धर्म. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर जो दररोजचे व्यवहार चालवू देतो, तो धर्म. आता, प्रत्येक मनुष्य वेगळा आहे, हे मान्य असेल तर हा धर्म सामूहिक कसा असेल? प्रत्येक मनुष्य वेगळा आहे, मी काय बोलतो त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या प्रकृतीप्रमाणे समजणार, तुम्ही काय बोलता त्याचा अर्थ मी माझ्या प्रकृतीप्रमाणे घेईन. मग, सगळ्यांनी एकच भाषा वापरली, एकच प्रार्थना म्हटली, एकच गीता वाचली किंवा एकच कुराण पढले; तरी प्रत्यक्षामध्ये त्याचा अर्थ वेगवेगळा असणार. कारण तुमची प्रकृती वेगवेगळी असते. हे एकदा मान्य केले, की सामूहिक धर्म ही धर्माधिपतींची किंवा पीठाधिपतींची फक्त सोय आहे असा निष्कर्ष निघतो. या सामूहिक धर्मकल्पनेच्या धोक्यातून मनुष्यजातीला आणि मनुष्यप्राण्याच्या व्यक्तिमत्त्वाला जगवायचं कसं, हा सगळ्यांत महत्त्वाचा प्रश्न आहे.

पोशिंद्यांची लोकशाही / १९९