पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समान नागरी कायदा नसावा, असं माझं मत आहे. कारण सरकार किमान असावं असं माझं मत आहे. राजकीय सरकारला माझी नैतिक तत्त्वं ठरवण्याचा अधिकार असता कामा नये. माझ्या श्रद्धेच्या भागाला हात लावण्याचा अधिकार सरकारला असता कामा नये. सरकारची भूमिका मर्यादित असली पाहिजे. समाजसुधारणा करायचा प्रयत्नसुद्धा करू नये. धर्मसंस्था असल्या पाहिजेत; कारण धर्म ही माणसाची एक वेगळी श्रद्धेची जागा आहे. माणसाला बुद्धी आहे, माणसाला श्रद्धा आहे, माणसाला सुखानं जगायचं आहे, पोषण करायचं आहे, माणसाच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रज्ञा आहेत, त्या वेगवेगळ्या प्रज्ञांची वेगवेगळी सरकारं असली पाहिजेत. मुख्यमंत्री आल्यावर कुलगुरुनं उठून उभं राहायचं आणि सलाम करायचा - मग तो कॉपी करून पास झालेला का असेना! हे असलं सरकार आम्हाला मान्य नाही! विद्वानांचं शासन वेगळं असलं पाहिजे. भर्तृहरीच्या वाङ्मयात एक प्रसंग चित्रित केलेला आहे. राजाच्या दरबारात उभं राहून एक पंडित राजाला म्हणतो, "अरे, तू स्वतःला काय समजतोस? तुझ्याकडं सत्ता-संपत्ती आहे तर माझ्याकडं गुरूची प्रज्ञा, अभ्यास आणि व्यासंग आहे! तुझ्याकडे तुला मान देणारे आहेत, तर माझ्याकडे शिष्य आहेत! तू मला तुच्छ मानत असशील, तर मीसुद्धा तुला तुच्छ मानतो!" आपल्याकडं असं बोलू शकणाऱ्या विद्वानांची एक परंपरा होती. ती समाजवादानं खलास केली आणि कुलगुरूदेखील मुख्यमंत्र्याला सलाम घालू लागले! स्वातंत्र्याचे पोवाडे गाणारे शाहीर जो मुख्यमंत्री असेल, त्याची स्तुतिकवनं रचायला लागले. कलाकार राज्यकर्त्यांपुढे वाकायला लागले. धर्मशाळा न राहिल्यामुळं गरिबांना गरज पडल्यावर सरकारकडे जावं लागू लागलं. ही सगळी परिस्थिती समाजवादामुळं आली.
 समजा, मी निधर्मी आहे आणि 'परमेश्वर आहे की नाही,' हा प्रश्न चर्चेला घ्यायच्यासुद्धा लायकीचा नाही, असं माझं मत आहे; तरीही तुमचा जर एखाद्या देवावर विश्वास असला, तर तुमच्या खासगी जीवनात तुमच्या श्रद्धेच्या, तुमच्या प्रिय देवतेची पूजा करण्याचा अधिकार कायम राहावा याकरिता मी जीव टाकायला तयार आहे; पण सार्वजनिक देवासाठी मी काहीही करणार नाही. सार्वजनिक देव हा खोटाच असतो. सार्वजनिक देव ही कल्पनाच मुळात खोटी आहे. मीराबाई जर केवळ कल्पनेनं, प्राण गेला तरी आपल्या गिरिधराला मानत असेल, तर तिच्या भक्तीला आव्हान द्यायचे काही कारण नाही. तुम्ही खासगीमध्ये काय करता, याच्याशी माझा काही संबंध नाही. तुम्हाला तुमचा खासगीपणा जपता यावा; यासाठी मी लढायलाही तयार होईन; पण तुम्ही जर असं म्हणायला लागला, की

पोशिंद्यांची लोकशाही / १८४