पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझा हा देव सार्वजनिक आहे; तर मग त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्याचा मलाही अधिकार प्राप्त होतो. स्वित्झर्लंडमध्ये असताना माझी एक पर्सनल सेक्रेटरी होती. कठोर, कर्मठ कॅथॉलिक ख्रिश्चन. तिनं मला सांगितलं, "माझ्या येशूचा जन्म कुमारी आईच्या पोटी झाला आणि क्रूसावर चढल्यानंतर तो पुन्हा एकदा जिंवत होऊन आला. माझी या गोष्टीवर इतकी अढळ श्रद्धा आहे, की तुम्ही कितीही माझं मन वळवायचा प्रयत्न केला, तरी माझी यावरची श्रद्धा हटत नाही." मी तिला म्हणालो की, "ज्यांची अशी खरी श्रद्धा आहे, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे."
 या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर आमचं असं म्हणणं आहे, की सरकारनं कायदा लादू नये. एक असा समान नागरी कायदा करावा, जो कायदा जन्मतः सर्व नागरिकांना आपोआप लागू होईल; पण जर कुणी असं म्हणालं, की हा कायदा मला नको आहे, मला माझ्या शरीयतप्रमाणे किंवा मनुस्मृतीप्रमाणे वागायचं आहे तर त्याला ते स्वातंत्र्य असलं पाहिजे. हा 'फ्रीडम ऑफ फेथ-फ्रीडम ऑफ बिलिफ'चा भाग आहे. यातून थोड्याफार त्रासदायक गोष्टी निर्माण होणार असल्या, तरी त्याला तोंड दिलं पाहिजे. कारण हजारो वर्षांची परंपरा तुम्ही सहजासहजी पुसून टाकू शकत नाही. काही ठिकाणच्या रूढींनाही कोर्टानं मान्यता दिलेली आहे; पण त्यांनी त्यासंबंधी निवेदन केलं पाहिजे, की मी या धर्मशास्त्राप्रमाणे चालणार आहे. पालकाला आपल्या जन्मतः अज्ञान मुलाकरिता असं निवेदन करायची परवानगी आहे. वयात आल्यानंतर पाहिजे असेल, तर त्या मुलानं निवेदन बदलून घ्यावं. एकाच धर्मामधल्या, एकाच धर्मशास्त्राचा नागरी कायदा मानणाऱ्या दोन जणांमध्ये जर काही वाद झाला, तर सरकारी कोर्ट त्यात दखल देणार नाही. तुम्ही, तुमचे काजी-मुल्ला काय करायचं ते करून घ्या. तुम्हाला सरकारी संरक्षण मिळणार नाही.
 पुढची तरतूद अशी, की एकच धर्मशास्त्र मान्य केलेल्या दोघांपैकी एकाने जरी असं म्हटलं, की मला धर्मशास्त्राप्रमाणे नाही, राष्ट्रीय कायद्याप्रमाणे वागायचे आहे, तर त्या दोघांनाही राष्ट्रीय कायदा लागू होईल. जिथं 'विवाद' आहे तिथं 'संशयाचा फायदा' हा राष्ट्रीय कायदा जन्मतः किंवा वयात आल्यानंतर जर का कुणी धर्मकायदा मान्य केलेला असेल; पण नंतर कधीतरी असं म्हटलं, की नाही, मला आता राष्ट्रीय कायदा पाहिजे, तरीसुद्धा त्याला ते करता येईल, दोन वेगवेगळ्या धर्मशास्त्रांमधले दोन पक्ष असतील, तर त्यांच्यात नागरी संबंध हे राष्ट्रीय कायद्याने होतील. म्हणजे प्रत्येक वेळी 'संशयाचा फायदा' राष्ट्रीय कायद्याला दिला जाईल. ४४ व्या कलमाची पूर्तता होऊ शकेल. म्हणजे खऱ्या खर्थाने नागरी कायदा सर्व नागरिकांना उपलब्ध व्हावा अशी जी तरतूद आहे, ती पूर्ण करण्याचा हा सगळ्यांत योग्य मार्ग आहे.

पोशिंद्यांची लोकशाही / १८५